Netanyahu On Gaza War : गाझाविरुद्धच्या युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

जेरुसलेम – गाझा युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर आहोत, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले. जोपर्यंत हमास सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही त्यांनी हमासला ठणकावले.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धाला प्रारंभ झाला होता. युद्धाला ६ मास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नेतान्याहू यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीला संबोधित केले. ते म्हणाले की, इस्रायल तडजोडीसाठी सिद्ध आहे; मात्र आत्मसमर्पण करणार नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलवर दबाव आणला जात आहे. खरे तर हा दबाव हमासवर आणला गेला पाहिजे. यामुळे ओलिसांची सुटका करणे शक्य होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच नेतान्याहू यांच्याशी संपर्क साधून तात्काळ युद्धबंदीची मागणी केली होती.

इस्रायलवरील आक्रमणांमागे इराणचा हात ! – नेतान्याहू यांचा आरोप

इस्रायलवरील अनेक आक्रमणांमागे इराणचा हात असल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला. ते म्हणाले, ‘जो कुणी आम्हाला दुखावतो किंवा आम्हाला दुखावण्याचा विचार करतो, त्याला आम्हीसुद्धा दुखावू. आम्ही या तत्त्वाचे नेहमीच पालन करतो.’

इस्रायलने काही दिवसांपूर्वी केलेल्या हवाई सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमधील इराणचे वाणिज्य दूतावास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या आक्रमणात इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड फोर्स’चे वरिष्ठ कमांडर महंमद रजा जाहेदी यांच्यासह ५ जण ठार झाले. तेव्हापासून अरब देशांमध्ये इस्रायलच्या विरोधात रोष आहे. अशा परिस्थितीत गाझामध्ये युद्ध फैलण्याची भीती वाढली आहे.