पाकच्या ऊर्जा संकटात होणार वाढ
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. आता त्याचा मित्र असणार्या चीनने त्याला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान अंधारात बुडू शकतो. खैबर पख्तुनख्वामध्ये आतंकवादी आक्रमण करून चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे चीनने दासू जलविद्युत् प्रकल्पाचे काम थांबवले आहे. ‘हार्बिन इलेक्ट्रिक इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड’ या प्रकल्पाची देखरेख करणार्या चिनी आस्थापनाने पाकिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थितीचे कारण देत काम थांबवण्याची नोटीस जारी केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान चिनी अभियंत्यांना भेटायला आले होते आणि त्यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले होते; मात्र चिनी आस्थापनाने काम थांबवल्याने ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या बोलण्यावरही चिनी नागरिकांचा विश्वास नाही’, हे दिसून आले आहे. या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबावर पाकिस्तानमध्ये आधीच चिंता व्यक्त करण्यात आली आहे; कारण करारानुसार हा प्रकल्प आधीच वेळेच्या मागे आहे.
सौजन्य India.com
गेल्या महिन्यात २६ मार्च या दिवशी इस्लामाबादहून दासूला जाणार्या चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर आतंकवादी आक्रमण झाले होते. ज्यामध्ये एक पाकिस्तानी चालक आणि ५ चिनी नागरिक ठार झाले होते. या घटनेनंतर चिनी कर्मचार्यांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे आता चिनी आस्थापनाने प्रकल्पाचे काम थांबवले आहे. प्रकल्पाचे व्यवस्थापक यू होंग म्हणाले की, आक्रमणाचा नकारात्मक परिणाम कामावर झाला आहे.