पणजी, ६ एप्रिल (वार्ता.) : सांतीनेझ (सांत इनेज), पणजी येथील ‘वेलनेस’ औषधालयाजवळील २०० वर्षे जुने वडाचे झाड अखेर ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’ या संस्थेच्या व्यवस्थापनाने ५ एप्रिल या दिवशी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कापले. पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांचा विरोध डावलून हे झाड कापण्यात आले.
यामुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिक यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गप्रेमींनी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची सिद्धता दर्शवली आहे.
(सौजन्य : Goa 365 TV)
‘स्मार्ट सिटी’च्या व्यवस्थापनाने कामात अडथळा ठरत असल्याने २०० वर्षे जुने वडाचे झाड कापण्याचे ठरवले होते. यामुळे ५ एप्रिल या दिवशी सकाळपासून सांतीनेझ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी काही प्रमाणात झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. याला विरोध करण्यासाठी ‘गोवा ग्रीन ब्रिगेड’चे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी आले होते. कार्यकर्त्यांनी याविषयी वनखात्याकडे तक्रारही नोंदवली होती; मात्र वन खात्याने कोणतीही कारवाई न केल्याने तणाव वाढत होता. यामुळे अखेर या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. रात्री ११ वाजेपर्यंत पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, वन खात्याचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. कार्यकर्ते घरी परतताच हे झाड कापण्यात आले.
संपादकीय भूमिकामनुष्याला प्राणवायू देणारी वडासारखी झाडे कापून बनवलेली स्मार्ट सिटी काय कामाची ? |