पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी नळजोडणी खंडित केल्याने विक्रमी पाणीपट्टीची वसुली !

पिंपरी (पुणे) – पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने गेल्या ६ महिन्यांत अनुमाने ३०० नळजोडण्या खंडित केल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या थकबाकी वसुलीसह ३१ मार्चपर्यंत ७८ कोटी ५८ लाख रुपये विक्रमी पाणीपट्टी वसूल झाली आहे. शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असे १ लाख ७६ सहस्र अधिकृत नळजोड धारक आहेत. पाणीपट्टी वसुलीचे काम महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मिळकतकर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे दिले होते. (कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकित का राहिली ? याचे उत्तर प्रथम आयुक्तांनी दिले पाहिजे. – संपादक) मिळकतकर विभागाने पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोड खंडित करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणार्‍या ३०० हून अधिक मिळकतधारकांचे नळजोड खंडित केले.

मिळकतकर आणि पाणीपट्टी यांच्या संदर्भात एकत्रीकरण निविदा प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे नागरिकांना दोन्ही कर एकत्रित भरणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. कर संकलन विभागातील कर्मचारी आणि मीटर निरीक्षक यांच्या माध्यमातून पाणीपट्टी आणि मिळकतकर अशा दोन्ही करांची रक्कम वसूल करता आली. पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई निरंतर चालू रहाणार असून अवैध नळ जोडही खंडित केले जातील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.