पुणे – नवीन समाविष्ट, तसेच शहराच्या जुन्या हद्दीतील ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही सुविधा विनामूल्य आहे; परंतु टँकरचालकांकडून पैशांची मागणी केली जात आहे. पैसे दिल्याविना पाणी सोडले जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे टँकरचालकांनी पैशाची मागणी केल्यास त्वरित नि:शुल्क दूरभाष क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (तक्रारींवर काय उपाययोजना केली ? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे ! – संपादक)
टँकरचालकांकडून पैशांची मागणी करण्यात आल्यास टँकर क्रमांक, पैशांची मागणी करणार्या व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरभाष क्रमांकासह महापालिकेच्या १८००१०३०२२२ या नि:शुल्क दूरभाषवर संपर्क साधता येऊ शकतो, तसेच ८८८८२५१००१ या भ्रमणभाष ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही तक्रार प्रविष्ट करता येईल. ‘पी.एम्.सी. केअर अॅप’वरही छायाचित्र आणि अन्य पुराव्यांसह तक्रार करता येईल, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले की, महापालिकेकडून नि:शुल्क पाणीपुरवठा केला जातो. टँकरचालक पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची तातडीने नोंद घेऊन कारवाई केली जाईल. (कारवाई करण्यासाठी कधीपर्यंतची समयमर्यादा ठेवणार ? हेही अभियंत्यांनी सांगावे ! – संपादक)