पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दगडी भिंतींना मोठ्या भेगा !


पंढरपूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन-जतन करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून चालू आहे. हे काम चालू असतांना मंदिरातील काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मंदिराचे छत, भिंती आणि दगडी खांब यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी खांब आणि भिंती यांना खिळे मारलेले आढळले आहेत.

मंदिराचे छत, भिंती आणि दगडी खांब यांना भेगा

या संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘‘सध्या जतन-संवर्धनाचे काम चालू असतांना मंदिरात अनेक ठिकाणचे दगड तुटलेले असणे, दगडी भिंतींना मोठ्या प्रमाणात खिळे मारलेले असणे, असे प्रकार आढळून आले आहेत. भिंतींवर चांदी लावतांना भिंतींना खिळे मारले आहेत. काही ठिकाणी चुना, तर काही ठिकाणी सिमेंट भरले गेले आहे. असे असले, तरी भरीव सरकारी निधीमुळे सध्या मंदिराचे जतन आणि संवर्धन यांचे काम चालू आहे आणि हे सर्व स्वच्छ करून त्याला पूर्वीचे भव्य स्वरूप देण्याचा मंदिरे समितीचा प्रयत्न राहील.’’

या संदर्भात पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे म्हणाले, ‘‘मंदिराच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने जेव्हा पुरातत्व विभागाला काम करण्यासाठी सांगण्यात येते, तेव्हा आम्ही ते करून देतो. भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आता हे काम विभागाच्या वतीने दुरुस्त केले जाईल.’’