श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

पंढरपूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम चालू आहे. या अंतर्गत ४ एप्रिलला नामदेव पायरीजवळील परिवार देवतांपैकी एक असलेल्या श्री गणपतीची मूर्ती कोणतीही पूजा न करता हटवल्याचा दाट संशय भाविक-वारकर्‍यांना आहे.

श्री गणपतीची ही मूर्ती ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असून ती बसवतांना विधीवत् पूजा करण्यात आली होती. ‘या अगोदरही मंदिरात असलेली श्री महालक्ष्मीदेवी, श्री हनुमान यांच्या मूर्ती नेमक्या कुठे आहेत ?’, असा प्रश्नही भाविकांकडून विचारण्यात येत आहे. मंदिर समितीचा यापूर्वीचा कारभार पहाता भाविकांमध्ये संतापाची लाट असून मंदिरांचे जतन करतांना कोणत्याही परिस्थितीत धर्मपरंपरांचे पालन झाले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

मंदिर समितीने विधीवत् पूजा केली असल्यास त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करावीत ! – ह.भ.प. वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ

ह.भ.प. वीर महाराज

या संदर्भात वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. वीर महाराज म्हणाले, ‘‘या संदर्भात मंदिर समितीच्या अधिकार्‍यांशी आमची चर्चा झाली असून त्यांनी विधीवत् पूजा केली, असे सांगितले आहे. जर मंदिर समितीने पूजा केली असेल, तर त्याची त्यांनी छायाचित्रे प्रसिद्ध करावीत. मंदिर समितीने जर पूजा केली नसेल, तर हा हिंदूंच्या धार्मिक कार्यात अनाठायी हस्तक्षेप आहे, असेच म्हणावे लागेल.’’

श्री गणपतीची मूर्ती विधीवत् पूजा करूनच हालवण्यात आली आहे ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

संवर्धनाचे काम चालू असतांना श्री गणपतीची मूर्ती विधीवत् पूजा करूनच हालवण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व छायाचित्रण आमच्याकडे आहे. देवतांविषयी आम्हास पूर्णत: आदर असून कोणत्याही देवतांविषयक अयोग्य गोष्टी, तसेच प्रथा-परंपरा यांचे जतन न करणे अशा गोष्टी आमच्याकडून कधीही घडणार नाही. हे काम आम्ही मोठ्या निष्ठेने पार पाडत आहोत.

संपादकीय भूमिका 

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !