रत्नागिरी – महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) वर्ष १९५१ चा कायदा २२ वा नुसार ४ एप्रिल २०२४ ला ००.०१ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२४ चे २४.०० वाजेपर्यत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे. १२ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत मुस्लिम धर्मीयांचा रमझान सण, तसेच ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडवा, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच १७ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमी हे सण साजरे होणार आहेत.
१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.