काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहाणे म्हणजे गुलामी मानसिकतेचे मळभ दूर होणे !

इ.स. ७११-७१२ मध्ये सिंध प्रांत जिंकून घेणार्‍या अरब फौजांनी जेव्हा उत्तरेकडे राज्यविस्तार करण्यासाठी आघाडी उघडली, तेव्हा काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने अरबांच्या सैन्याचा पंजाबमधील कांग्रा येथे दणदणीत पराभव केला.

याच ललितादित्याने काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य विलक्षण होते. मोढेरा, मुल्तान आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षाही मार्तंड सूर्यमंदिर भव्य होते. ब्रिटीश लेखक फ्रान्सिस यंगहजबंड म्हणतात, ‘‘जगातील कुठल्याही इमारतीपेक्षा अत्युत्कृष्ट जागी बांधल्या गेलेल्या या इमारतीवरून काश्मिरी लोकांमधील सर्वोत्कृष्टतेचे दर्शन घडते. बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर हसर्‍या काश्मीर खोर्‍याकडे नजर टाकणार्‍या या जागी उभे आहेत एका मंदिराचे भग्नावशेष ! एक असे मंदिर ज्यात होती इजिप्तची भव्यता आणि ग्रीकांची अभिजातता…’’

प्राचीन मार्तंड सूर्यमंदिर

धर्मांध सुलतान ‘सिकंदर’ याने मार्तंड सूर्यमंदिराचा केला विध्वंस !

श्री. अभिजित जोग

१४ व्या शतकात काश्मीरवर राज्य करणारा धर्मांध सुलतान ‘सिकंदर’ याने केलेल्या असंख्य मूर्तींच्या विध्वंसामुळे त्याला ‘सिकंदर बुतशिकन’ (मूर्तींचा विध्वंसक) या नावाने ओळखले जात असे. या सिकंदराने अप्रतिम स्थापत्याचा आणि सौंदर्याचा आविष्कार असलेले मार्तंड सूर्यमंदिरही उध्वस्त केले. याचा विध्वंस करायला सिकंदराला एक वर्ष लागले. शेवटी संपूर्ण मंदिरात लाकडे भरून ती पेटवून देण्यात आली, तरीही ते पूर्णपणे जमीनदोस्त झाले नाही. आजही या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या भव्यतेची आणि सौंदर्याची ग्वाही देतात.

देशाचे दळभद्री धोरण दूर होणे हे आनंददायी !

आनंदाची गोष्ट अशी की, मार्तंड सूर्यमंदिराच्या पुनर्उभारणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, तसेच सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळाही त्याच परिसरात उभारण्यात येणार आहे. ‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीवादाच्या) विकृत कल्पनेपायी, धर्मांध आक्रमकांनी केलेल्या अत्याचारांच्या खुणा जपून ठेवायच्या आणि भारतमातेच्या पराक्रमी सुपुत्रांची ओळख मात्र पुसून टाकायची, हे दळभद्री धोरण आपल्या देशाने दुर्दैवाने स्वीकारले होते. ते सोडून देऊन न्यूनगंड आणि गुलामी मानसिकतेचे मळभ दूर केले जात आहे, याचा आनंद अवर्णनीय आहे.

– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (साभार : फेसबुक)