श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात. या कृष्ण विहिरीची पूजा करण्याच्या अधिकारासाठी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायालयाने पूजेची अनुमती दिली होती.

सौजन्य Zee Uttar Pradesh UttaraKhand

१. मिळालेल्या माहितीनुसार ३४ हिंदू महिला १ एप्रिलला पहाटे ५ वाजता कृष्ण विहिरीच्या ठिकाणी पोचल्या. येथे त्यांनी शीतला मातेची पूजा केली. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही अनुमती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पूजा करण्यासाठी आलेल्या अन्य ७ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. या लोकांमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश शर्मा यांचाही समेवेश आहे. शीतला अष्टमीच्या दिवशी मशिदीत जाऊन पूजा करणार असल्याचे या लोकांनी आधीच घोषित केले होते. या संकुलात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

२. येथील महिला होळीनंतर या कृष्ण विहिरीच्या ठिकाणी जाऊन शीतला मातेची पूजा करतात. ही पूजा पुष्कळ दिवसांपासून होत आहे; मात्र जेव्हापासून हिंदूंनी श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली, तेव्हापासून मुसलमान ही पूजा होऊ नये, यासाठी व्यत्यय आणू लागले आहेत. गेल्या वर्षीही असेच घडले होते. ही विहीर हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. ती भगवान श्रीकृष्णाचा पणतू वज्रनाभ याने बांधली होती.