हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना संघटित करतांना व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक असून व्यष्टी साधनेमुळे वाणीत चैतन्य येऊन लोकांवर प्रभाव पडेल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे. याला ‘समष्टी साधना’ असे म्हटले जाते. ही समाजात जाऊन करायची साधना आहे. दुसरी साधना, जी स्वतःसाठी करायची, ती म्हणजे ‘व्यष्टी साधना’ ! नामजप करणे, ध्यान लावणे आदी व्यष्टी साधना झाली. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही प्रकारच्या साधना बरोबरीने व्हायला पािहजेत. व्यष्टी साधना चांगली होऊ लागली की, साधकांच्या वाणीत चैतन्य येऊ लागते आणि चैतन्यामुळे त्यांच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर चांगला परिणाम होतो. आपण विजेरी (टॉर्च) लावली; पण त्यात ‘सेल’च नसेल, तर उजेड कसा पडेल ? वाणीत चैतन्य नसल्यास लोक बुद्धीने आपले बोलणे ऐकतील आणि नंतर विसरून जातील; परंतु जेव्हा साधनेमुळे वाणीत चैतन्य येते, तेव्हा लोकांवर आपल्या बोलण्याचा परिणाम होतो आणि ते आपले होऊन जातात.

२. धर्मप्रसार कार्यामध्ये वेळेचा योग्य उपयोग होण्यासाठी साधना करून पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे ज्ञान प्राप्त करा ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

साधक समाजात धर्मप्रसार करण्यासाठी जातात. तेव्हा व्यक्तीकडे बघून समजले पाहिजे की, तिच्याशी बोलायचे कि नाही; कारण हे कार्य करतांना वेळेला पुष्कळ महत्त्व आहे. गोव्यातील वास्को शहरात एक नवीन गृहनिर्माण वसाहत (हाऊसिंग कॉलनी) आहे. तेथे ‘नवीन सत्संग चालू करावा’, यासाठी साधक प्रसार करण्यासाठी गेले होते. साधक पहिल्या घरात गेले आणि त्यांनी घरातील स्त्रीला आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्या स्त्रीने साधकांना घरात बोलावले. नंतर एक ते दीड घंटा साधक सनातनचे कार्य आणि साधना सांगण्यासाठी तेथे थांबले. त्या घरात एक पाळीव कुत्रा होता. तो दीड घंटा साधकांच्या शेजारीच बसला होता.

नंतर साधक तेथून बाहेर पडले, तर तो कुत्रासुद्धा घरातून बाहेर आला आणि कुठेतरी गेला. साधक बाजूच्या घरात गेले, तर तेथील लोकांनी सांगितले, ‘आम्ही बुद्धीप्रामाण्यवादी आहोत. आम्ही ईश्वर इत्यादी मानत नाही.’ त्यानंतर जवळचे तिसरे घर, चौथे घर, असे करत साधक पुढे गेले आणि त्यांनी पाहिले, तर कुत्रा सहाव्या घराच्या समोर बसला आहे. त्या घरात गेल्यावर तेथील लोकांनी साधकांचे चांगले स्वागत केले. ‘त्या वसाहतीत कोण साधना करील’, हे जाणून एकूण सहा घरांच्या बाहेर कुत्रा आधीच जाऊन बसला होता. त्याच सहा घरांतील लोकांनी साधकांचे स्वागत केले. नंतर साधकांनी त्यांच्यासाठी सत्संग चालू केला. ‘साधकांनी कुणाशी बोलायला हवे ?’, हे जर त्या कुत्र्याला समजते, तर साधना केली, तर मानवालासुद्धा ते समजेल आणि त्यांचा वेळ वाचेल !

३. अध्यात्मात श्रद्धेला पुष्कळ महत्त्व असून ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे’, अशी श्रद्धा असल्यास ईश्वराचे आशीर्वाद लाभून कार्य पूर्णत्वाला जाईल ! 

हिंदुत्वनिष्ठ : ‘सनातन संस्था’ ही आमची मातृसंस्था झाली. आमच्या इंदूरमध्ये (जिल्हा निजामाबाद) ७०० गावे आहेत. या ७०० गावांमध्ये जेव्हा आम्ही ४९ हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊ, तेव्हा ‘आम्ही रामनाथी आश्रमात येण्याचे सार्थक होईल आणि आपल्याप्रती आदरभाव व्यक्त होईल’, असे मला वाटते. हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे; कारण आम्हाला त्या संदर्भात ज्या अनुभूती येतात, त्या काल्पनिक नसून खर्‍या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असे जे आपल्याला वाटते, यालाच ‘श्रद्धा’ म्हणतात. अध्यात्मात श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. विश्वास मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरचा, तर श्रद्धा आध्यात्मिक स्तरावरची असते. श्रद्धा आहे, म्हणजे तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही ईश्वराचे आंतरिक सान्निध्यही अनुभवत आहात. पूर्वी लोकांना वाटत होते की, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणे’, हे केवळ स्वप्न आहे. ते कधीच स्थापन होणार नाही; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटत आहे की, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे !’

(परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन)