कोरोना काळात नागरिकांमध्ये एकी निर्माण करणे, हाच थाळीनाद आणि घंटानाद यांमागचा उद्देश होता ! – पंतप्रधान

जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद !

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

नवी देहली – तीन वर्षांपूर्वी देशात कोरोनाने थैमान घातले होते. या काळात आरोग्य यंत्रणेपासून प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत सर्वांवरच प्रचंड मोठे दडपण आणि भीतीचे वातावरण पहायला मिळाले. या काळात प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोनाचा सामना करण्याचा प्रयत्न करत होता. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारे लढा देण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाविक प्रसारमाध्यमांवर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून देशवासियांना थाळ्या वाजवण्याचे, टाळ्या वाजवण्याचे आणि दिवे लावण्याचे आवाहन केले होते. यावर त्या वेळी बरीच चर्चाही झाली होती. त्याचे कारण मोदी यांनी आता स्पष्ट केले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले. या प्रसंगी बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘कोरोना काळात भारतातील परिस्थितीचे नियोजन कसे केले ?’ अशी विचारणा केली असता पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पुढील उत्तरे दिली.

१. ‘ही लढाई आपल्या सर्वांची आहे’, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यावर भर !

मी ‘कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाई ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे’, हे लोकांमध्ये जागृती करून त्यांच्या मनावर बिंबवण्यावर भर दिला. ही लढाई ‘विषाणू विरुद्ध सरकार’ अशी नसून ती ‘स्वतःचे आयुष्य विरुद्ध विषाणू’ अशी आहे, ही माझी भूमिका होती. त्यासह मी कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून देशातील सर्व नागरिकांशी चर्चा करत होतो. मी स्वत: सगळे नियम पाळून त्यातून लोकांसमोर उदाहरण ठेवले, असे मोदी यांना बिल गेट्स यांना सांगितले.

२. लोकांमध्ये संघटित भाव निर्माण करण्यासाठीच थाळीनाद आणि घंटानाद करायला सांगितला !

मोदी यांनी त्यांच्या थाळीनाद किंवा दीप प्रज्वलित करण्याच्या आवाहनाविषयी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘मी तेव्हा सर्वांना टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितले, तसेच दिवे लावायला सांगितले, तेव्हा आमच्याच देशात काही जणांनी चेष्टा-मस्करी केली; पण मला लोकांना विश्‍वासात घ्यायचे होते की, आपल्याला ही लढाई एकत्र लढायची आहे. तेव्हा लोकांमध्ये हा आत्मविश्‍वास निर्माण झाला की, आपल्याला स्वतःचे आयुष्य वाचवतानांच इतरांचेही आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग ती एक व्यापक चळवळ झाली.

३. लोकांचा लसीवर विश्‍वास बसण्यासाठी आधी मी आणि माझ्या आईने लस घेतली !

बळाचा वापर करून काम होत नाही. तुम्ही लोकांना माहिती द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना समवेत घेऊन चला. हा माझा मोठा उपक्रम होता. त्यामुळे मला लसीकरणात मोठे साहाय्य झाले. कुणीही मला थांबवले नाही. मला आर्थिकदृष्ट्या अनेक समस्या आल्या; कारण मला लस बनवण्यासाठी संशोधन करायचे होते. त्यानंतर लोकांना विश्‍वास द्यायचा होता की, ही लस काम करेल. मग त्यासाठी मी स्वत: लस घ्यायला गेलो. माझ्या आईचे तेव्हा ९५ वय होते. तिनेही लस घेतली. यातून मी लोकांसमोर उदाहरण ठेवले. मग लोकांचा यावर विश्‍वास बसला. त्यामुळे नंतर मी देशवासियांना जे काही सांगायचो, त्याचा स्वीकार व्हायचा, असे मोदी यांनी बिल गेट्स यांना सांगितले.

स्वतःच्या डीपफेक व्हिडिओचे उदाहरण देत पंतप्रधान मोदी यांचा ‘एआय’च्या वापराविषयी संवाद !

बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची कामगिरी, भारतासह जगभरातील देशांसमोरील आव्हाने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात एआय) इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेच्या वेळी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘एआय’मुळे निर्माण झालेली नवी आव्हाने भारत कशी पेलणार ?, असा प्रश्‍न विचारला. यावर मोदी यांनी त्यांच्या डीपफेक (खोटा) व्हिडिओचा संदर्भ देत ही आव्हाने कशी पेलता येतील ?, याविषयी भाष्य केले. ते म्हणाले,

१. …तर ‘एआय’चा गैरवापर होण्याची शक्यता !

‘एआय’ने आपल्यासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. उत्तम प्रशिक्षणाखेरीज अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली, तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. कुठलीही सामग्री ‘एआय’च्या माध्यमातून बनवली असल्याची लोकांना निश्‍चिती व्हायला हवी.

२. ‘एआय’विषयी  नियमावली हवी !

‘डीपफेक’ हे ‘एआय’मुळे निर्माण झालेले एक मोठे आव्हान आहे. भारतात हल्ली ‘डीपफेक’ सामग्री बनवली जात आहे. माझ्या स्वतःचा ‘डीपफेक’ व्हिडिओदेखील मी पाहिला आहे. कोणीतरी माझ्या आवाजात एखादी घाणेरडी गोष्ट बनवली आणि समाजमाध्यमांवर प्रसारित केली, तर प्रारंभी लोकांना ते खरे वाटेल. त्यामुळे देशभरात गदारोळ माजेल. त्यामुळे ‘डीपफेक’ सामग्रीचा मुख्य स्रोत लोकांना समजला पाहिजे. ‘एआय’विषयी किंवा डीपफेकविषयी नियमावली सिद्ध करायला हवी.

३. आमच्याकडे मूल जन्मल्यावर सर्वप्रथम ‘ए आई’ म्हणते !

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ‘एआय’चे महत्त्व सांगतांना ते चेष्टेने म्हणाले आमच्या देशात मातेला अनेक राज्यांत ‘आई’ म्हणतात. आमच्याकडे मूल जन्माला आल्यावर ते सर्वप्रथम ‘ए आई’ म्हणते.

४. ‘एआय’चा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात साहाय्यभूत ठरायला हवा !

‘एआय’चा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात साहाय्यभूत ठरायला हवा. मी ‘काशी-कमिल संगमम्’ हा कार्यक्रम आयोजित केला. काशीत तमिळनाडूमधील अनेक लोक आले होते. तिथे मी हिंदीतून बोललो; पण तिथल्या सर्व लोकांनी माझे भाषण ‘एआय’च्या माध्यमातून तमिळमध्ये ऐकले, अशी आठवण मोदी यांनी या वेळी करून दिली.

५. ‘एआय’ तंत्रज्ञानाशी स्पर्धा हवी !

या वेळी पंतप्रधानांनी एआय तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘मला पत्र लिहायचे असेल आणि मी जर ‘चॅट जीपीटी’ला सांगितले  की, मला पत्र लिहून दे, तर ते चुकीचे आहे. आपण ‘चॅट जीपीटी’शी स्पर्धा करायला हवी. त्याच्याशी वाद घालायला हवा की, तू अमूक गोष्ट व्यवस्थित करत नाही. आपण ‘एआय’च्याही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा.’’