प्रेमळ आणि देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती शकुंतला लासुरे (वय ८४ वर्षे) !

‘माझी आजी (कै.) श्रीमती शकुंतला लासुरे (आईची आई) हिचे ५.१.२०२३ या दिवशी निधन झाले. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये, तसेच तिच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) श्रीमती शकुंतला लासुरे

१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. एकता नखाते

१ अ. प्रेमभाव : आजीला एकूण १८ नातवंडे होती. तिने तिच्या सर्वच नातवंडांवर समान प्रेम केले. प्रत्येकाच्या आवडी-नावडी तिला ठाऊक होत्या. आमच्या आनंदात तिचा आनंद असायचा. सर्वांना तिचा आधार वाटायचा. कधी माझे मन दुःखी झाले, तर केवळ तिच्या जवळ बसले, तरी माझ्या मनाला उभारी यायची. तिच्या सान्निध्यात मला ताण आणि भीती यांचा विसर पडायचा.

१ आ. इतरांना साहाय्य करणे : आमच्यावर तर तिचे पुष्कळ प्रेम होतेच; पण घरात येणारे पाहुणे, नातेवाईक आणि आजूबाजूला रहाणारे लोक यांना काही हवे असल्यास ती सतर्क राहून निरपेक्ष भावाने त्यांना साहाय्य करत असे. तिच्या या गुणामुळे ती सर्वांची आवडती होत असे.

१ इ. सतत कार्यरत रहाणे : पूर्वीपासूनच तिला कामात व्यस्त रहाण्याची आवड होती. ‘रिकामे कधी बसायचे नाही. सतत काही ना काही तरी करत रहायचे’, असे ती आम्हाला सांगायची आणि ती स्वतःही तसे करायची.

१ ई. लहानपणापासून केलेली साधना : आजीची देवावर पुष्कळ श्रद्धा होती. लहानपणापासूनच ती उपवास करायची. ‘व्रत-वैकल्ये करणे’, हा तिच्या दिनचर्येचाच भाग होता. नामजपाचे महत्त्व कळल्यानंतर ती अधिकाधिक वेळ नामजप करत असे.

१ उ. योग्य नामजप करण्याची तळमळ : मी आजीला ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितले. तेव्हा तो नामजप तिच्या लक्षात न राहिल्याने ती ‘सुविचार’, असा जप करत असे. त्या वेळी आम्हाला हसायला आले; पण ‘तिचा निरागस भाव आणि नामजप देवापर्यंत पोचत आहे’, असे मला वाटले. जेव्हा आजीला कळले की, ती चुकीचा जप करत आहे, तेव्हा तिने मला ‘निर्विचार’, हा नामजप कागदावर लिहून द्यायला सांगितला. आजी नामजप लिहिलेला तो कागद नेहमी जवळ ठेवायची आणि देवासमोर बसली की, कागद घेऊन जप करायची.

१ ऊ. आश्रमाप्रतीचा भाव : आजीने १ मास देवद आश्रमात राहून सेवा केली. रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘आश्रम म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे आश्रम पहाण्यासाठी पायीच जायला हवे’, असा तिचा भाव होता. त्यामुळे आश्रमात असतांना तिने उद्वाहन यंत्राचा (लिफ्टचा) वापर केला नाही.

२. शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे

२ अ. आजीच्या मूत्रपिंडाला सूज येणे, शरिरातील सोडियमचे प्रमाण न्यून झाल्याने तिने प्रतिसाद न देणे आणि सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितलेला जप लावून ठेवल्याने आजीने सर्वांना ओळखणे : निधनाच्या १५ दिवस आधी आजी अकस्मात् पुष्कळ आजारी पडली. ती झोपूनच होती. तिला डोळेसुद्धा उघडता येत नव्हते. तिला कोणताही प्रतिसाद देता येत नव्हता. अशा स्थितीत ‘घरातील कोणालाही माझ्यामुळे त्रास होऊ नये’, असाच विचार ती सतत करत असे. त्यानंतर रुग्णालयात भरती केल्यावर तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आजीच्या मूत्रपिंडाला पुष्कळ सूज आहे आणि शरिरातील सोडियमचे प्रमाण न्यून झाले आहे. असे झाले, तर व्यक्तीला विस्मरण होते.’’ त्याच दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेला जप मी भ्रमणभाषवर रात्रभर आजीजवळ लावून ठेवला. दुसर्‍या दिवशी जेव्हा आजीने डोळे उघडले, तेव्हा तिने आम्हा सर्वांना ओळखले आणि हात जोडून नमस्कार केला. आधुनिक वैद्यांनाही हा चमत्कार वाटला. त्या वेळी मला सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या जपाची प्रचीती आली.

२ आ. पुष्कळ वेदना होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करणे : दुसर्‍या दिवशी आजीला पुष्कळ वेदना होत होत्या. तिला हालचाल करता येत नव्हती. त्याही स्थितीत कोणी तिच्याशी बोलले, तर ती प्रतिसाद देत होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवल्यानंतर तिने प्रयत्नपूर्वक हात जोडून त्यांना नमस्कार केला.

२ इ. भ्रमणभाषवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे बोलणे ऐकून प्रतिसाद देणे आणि असह्य वेदनांमध्येही आनंद अनुभवणे : आजी ४ – ५ दिवस अतीदक्षता विभागात होती. तिचे खाणे-पिणे बंद झाले होते. हळूहळू आजीच्या वेदना वाढल्या आणि तिचे सर्वांग सुजले. ती तोंडातून आवाज काढून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मला आजीची ही अवस्था बघवत नसल्याने मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना भ्रमणभाष केला आणि त्यांना ‘आजीशी बोलता का ?’, असे विचारले. त्यांनी होकार देताच मी भ्रमणभाष ‘स्पीकर’वर करून आजीच्या कानाजवळ धरला. त्या वेळी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘आजी जप चालू आहे ना ? जप चालू ठेवा. देव समवेत आहे. कुटुंबाची काळजी वाटते का ?’’ तेव्हा आजीने स्पष्टपणे ‘नाही’ म्हटले. त्यावर सद्गुरु काका म्हणाले, ‘‘गुरुदेव सर्वांची साधना करून घेणार आहेत. तुम्ही काळजी करू नका.’’ त्या वेळी आजीला असह्य वेदनांमध्येही आनंद अनुभवतांना मी पाहिले. त्यानंतर आजीला रुग्णालयातून घरी आणले. घरी आणल्यानंतर आजीचे बोलणे बंद झाले. त्या वेळी मला वाटले, ‘सद्गुरु काकांशी संभाषण होईपर्यंत देवानेच आजीला शक्ती दिली होती.’

२ ई. आजीने भिंतीकडे बघून हात वर करणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी बाजूच्या घरातून त्रासदायक स्पंदने येत असल्याचे सांगणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर आजीचे हात वर करणे थांबणे : आजीला घरी आणल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे ‘आजीला वेदनांतून मुक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना केली. सर्व जण (५ मामा, मामी आणि त्यांची मुले) थोडा थोडा वेळ आजीजवळ बसून जप करत होते. आजीला पलंगावर जेथे झोपवले होते, त्या बाजूच्या भिंतीकडे बघून आजी हात वर करून हलवत होती आणि मानही हलवत होती. ‘ती कोणाला तरी थांबवत आहे’, असे मला वाटत होते. सद्गुरु गाडगीळकाकांना हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘बाजूच्या घरातून त्रासदायक स्पंदने येत आहेत. त्या ठिकाणी उदबत्ती लावा आणि खोके ठेवा.’’ हा उपाय केल्यानंतर आजीने हात वर करण्याचे थांबवले.

२ उ. परिचारिकेने सांगितल्यावर आजीला लावलेला ऑक्सिजन काढण्यात येणे : आजीची अस्वस्थता पुष्कळ वाढली. त्या वेळी घराजवळील रुग्णालयात काम करणार्‍या एका मुलाने येऊन आजीच्या नाकात घातलेली नळी काढली. त्या वेळी ‘देवच त्या मुलाच्या माध्यमातून आला’, असे मला वाटले. आजी आमच्याकडे पाहून प्रतिसाद देत होती; पण आता तिने डोळे वर केले होते. तिचे डोळे शून्यात गेले होते. घरात तणावाचे वातावरण होते. त्याच वेळी ज्या मुलाने आजीच्या नाकातील नळी काढली होती, तो त्याच्या आईला घेऊन आला. त्याची आई अनुभवी परिचारिका होती. आजीला बघताच त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आजींची सेवा करा. त्यांचा अंतकाळ थांबवू नका. आजींना ऑक्सिजन आणि सलाईन लावून तुम्ही त्यांच्या वेदना वाढवत आहात.’’ त्या परिचारिकेने हे सांगितल्यानंतर सर्वांना जाणीव झाली आणि आजीला लावलेला ऑक्सिजन काढला.

२ ऊ. दुसर्‍या दिवशी गुरुवार होता. ‘आजीला भक्तीसत्संग ऐकवूया’, असे आम्ही ठरवले. घरातील बाकी सर्व जण बाहेर गेले. त्यामुळे आजीला शांततेत भक्तीसत्संग ऐकवता आला.

३. निधन : ५.१.२०२३ या दिवशी दुपारी १२.३० नंतर आजीची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी तिचा तिथीनुसार वाढदिवस होता.

४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. आजीच्या निधनानंतर कोणीही मोठ्याने रडले नाही. सर्वांनी मिळून भावपूर्ण प्रार्थना केली. घरातील सर्व साधक नसतांनाही सर्व जण शांत राहून अंत्यविधीची सिद्धता करत होते.

आ. ‘घरात कोणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटत नव्हते.

इ. आजीची त्वचा पिवळसर झाली होती. तिचा चेहरा तेजस्वी वाटत होता.

ई. ‘आजी गाढ निद्रेत आहे’, असे वाटत होते. तिला बघून मनाला शांतीची अनुभूती येत होती.

उ. आजी विठ्ठलभक्त असल्याने अंत्ययात्रा निघण्यापूर्वी सर्वांनी विठ्ठलाची आरती केली. त्या वेळी मला आकाशात विठूमाऊली आणि रुक्मिणीमाता यांच्यासह आजीचा हसरा चेहरा दिसला.

ऊ. स्मशानभूमीत दाब जाणवत नव्हता, तसेच भीती वाटत नव्हती.

ए. आजीला अग्नी दिल्यानंतर चिता काही क्षणांत पेटून अग्नीच्या ज्वाळा उंच झेप घेत होत्या. ‘ते दृश्य बघून मन शांती अनुभवत आहे’, असे तेथे असणार्‍या सर्वांनी सांगितले.

‘गुरुमाऊली, ‘मृत्यूची स्थिती काय असते ?’, हे आजीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जवळून दाखवून दिले आणि साधनेचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले. प्रत्येक कठीण प्रसंगात दैवी लीला घडवून तुम्ही तुमच्या अस्तित्वाची साक्ष दिली; म्हणून आम्ही स्थिर राहू शकलो’, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. एकता नखाते ((कै.) श्रीमती शकुंतला लासुरे यांची नात (मुलीची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२३)