(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

अमेरिकेने अरुणाचल प्रदेशच्या सूत्रावरून भारताची बाजू घेतल्यावर चीनने थयथयाट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – अमेरिकेने अरुणाचल प्रदेशच्या सूत्रावरून भारताची बाजू घेतल्यावर चीनने थयथयाट केला आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे. भारतासमवेतचा सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य मार्ग आहे. इच्छाशक्ती आणि संवाद यांतून यावर तोडगा काढला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे उद्घाटन केल्यावर चीनने अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केला होता. त्यावर भारताने चीनला योग्य शब्दांत समज दिल्यानंतर अमेरिकेनेही यावर मत मांडले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले होते की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे आम्ही मान्य केले आहे. कुणीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अतिक्रमण केले, तर आम्ही त्यास विरोधच करू.

यावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, अमेरिका दोन देशांमध्ये भांडण लावत आहे. हाच अमेरिकेचा इतिहास आहे. खरेतर दोन्ही देश चर्चा आणि सल्लामसलत यांद्वारे सीमाप्रश्‍न सोडवण्याची इच्छा बाळगून आहेत; परंतु अमेरिका भारताला चिथावत आहे.

संपादकीय भूमिका

  • चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?