१० लाखांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त
पुणे – कोट्यवधी रुपयांच्या ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाच्या विक्री प्रकरणातील आरोपी शोएब सईद शेख याला कोंढवा भागातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून १० लाख रुपयांचे ५१ ग्रॅम ‘मॅफेड्रोन’ जप्त करण्यात आले. शोएब हा गेल्या महिन्यापासून पसार झाला होता. तो कोंढव्यात रहाणार्या त्याच्या आईला भेटायला आला असता पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी पकडली आहे. त्यांच्याकडून ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त केले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर शोएब पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध चालू होता. तो कोंढवा येथे आईला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.