पुणे शहरात धूलिवंदनाच्या दिवशी १४२ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नोंद !

१ सहस्र १५० जणांवर दंडात्मक कारवाई !

पुणे पोलिसांची मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई

पुणे – धूलिवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालवणारे १४२ चालक, तसेच नियमभंग करणार्‍या १ सहस्र १५० वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. धूलिवंदनाच्या दिवशी भरधाव वाहने चालवल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर २५ मार्च या दिवशी २७ ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीमध्ये ‘ब्रीथ अ‍ॅनालायजर’ (मद्य प्राशन केले कि नाही हे पडताळणारे यंत्र) यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यात १४२ जणांनी मद्य प्राशन केल्याचे आढळले. त्यांच्याविरोधात कारवाई करून खटले प्रविष्ट (दाखल) करण्यात आले, तर दुचाकीवर तिघांनी प्रवास करणार्‍या २२६ जणांवर, मोठ्याने ‘हॉर्न’ (भोपू) वाजवणे, सिग्नल तोडणे अशा ९३३ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

संपादकीय भूमिका

सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !