‘आशिया खंडाचे हृदय म्हणून ओळखला जाणारा देश अफगाणिस्तान सध्या सर्वसमावेशक कट्टरपंथी आजारांनी ग्रस्त झाला आहे. त्यामुळे या देशाला परकीय सत्तांनी कह्यात ठेवण्याचा बराच प्रयत्न केला; पण तरीही दीर्घकाळासाठी अफगाण भूमीवर कोणत्याही सत्तेचा प्रभाव टिकू शकला नाही. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे ‘सोव्हियत युनियन’ने (सध्याच्या रशियाने) वर्ष १९७९ मध्ये राष्ट्राध्यक्ष लियोनिड ब्रेझनेव्ह यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात चालू केलेली लष्करी कारवाई; पण पुढच्या काही वर्षांतच सोव्हियत युनियनला अफगाण भूमीवरून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर निर्माण झालेली सत्तेची पोकळी भरून काढण्यासाठी मुल्ला महंमद उमरच्या तालिबानने वर्ष १९८९ मध्ये अफगाणिस्तानला इस्लामिक अमिरात घोषित केले; पण या तालिबानी राजवटीत जे व्हायला नको, त्यापेक्षाही भयंकर परिणाम सर्व जगाला तालिबान राजवटीत दिसू लागले. तालिबान राजवट ही आतंकवाद्यांना आसरा देण्याचे मुख्य केंद्र बनले. यातच ‘अल-कायदा’ या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या मनातील सुप्त विचार, म्हणजे अमेरिकेला धडा शिकवण्याचा त्याच्या कूटनीतीक योजनेचा परिपाक, म्हणजेच ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’ आणि ‘पेंटागॉन’ या दोन्हींवरील क्रूर आक्रमण ! या दोन्ही आक्रमणात जवळपास ३ सहस्र नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर अमेरिका आतंकवादाच्या विरोधात जागतिक युद्धात गुंतली आणि घोषणा केली, ‘या युद्धात जे आमच्यासमवेत येतील ते आमचे सहकारी आणि जे साथ देणार नाहीत, ते विरोधक ठरवले जातील.’
येथे एक नमूद करण्यासारखे सूत्र, म्हणजे ११ सप्टेंबर २००१ या दिवशी ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’वर आतंकवादी आक्रमण झाले आणि त्यापूर्वी भारतात असे किती तरी आतंकवादी आक्रमणे घडून गेली; पण तेव्हा एकही पाश्चिमात्य राष्ट्र इतक्या ताठर भूमिकेने भारतासमवेत उभा राहिला नाही; पण अमेरिकेवरच्या आक्रमणाने आतंकवादाच्या विरोधातील संकल्पनाच पालटली गेली, तसेच याचे प्रखर प्रत्त्युत्तर म्हणून अमेरिकेचे अफगाणिस्तानच्या भूमीत जे पाय रोवले गेले, ते अफगाणचे पूर्ण भविष्य अंधारात ढकलण्यासाठीच ! या वरील सर्व घटनेचा आणि सध्या होत असलेल्या तालिबान शासित अफगाणिस्तान अन् पाकिस्तान संघर्षाचा काय संबंध आहे ? आणि या संघर्षाचे भारतावर होणारे परिणाम यांविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
१. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धात भारताला ओढण्याची शक्यता अन् दोन्ही देशांच्या युद्धाचा पाकवर झालेला परिणाम
१८ मार्च २०२४ या दिवशी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्ट आणि पक्तिका प्रांतातील ‘टीटीपी’च्या (‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या) लपलेल्या ६ आतंकवाद्यांना मारले. ही कारवाई पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमधील एका लष्करी चौकीवर झालेल्या आक्रमणात ७ सैनिक ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर केली गेली. मागच्या काही वर्षांपासून पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांविरुद्ध झालेल्या अनेक आक्रमणांपैकी ही सर्वांत मोठी कारवाई होती. त्यापैकी करण्यात आलेली बहुतेक आक्रमणे ही ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) केली आहेत. ही ती संघटना आहे जिचे अफगाण तालिबानशी फार जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आज हे दोघे मुसलमान बंधू (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) एकमेकांना संपवण्यासाठी शस्त्र घेऊन उभे आहेत. याचे परिणाम क्षेत्रीय राजकारणावर होऊन भारताच्या अवतीभोवती ‘फायर रिंग’ (युद्ध क्षेत्र) सिद्ध होऊन भारतालाही या आगीत ओढले जाण्याचा छुपा विचार काही राष्ट्रांच्या मनात आहे; पण ही घटना घडतांना एक गोष्ट लक्षात येते की, पाकिस्तानला कोणत्याही किमतीवर अफगाण भूमीवर नियंत्रण हवे आहे. ज्या वेळी अमेरिका अफगाण सोडून गेली, तेव्हाही पाकिस्तान याच विचारात होता आणि पाक लष्कराने काही प्रमाणात अफगाण भूमीवर वचकही निर्माण केला; पण असे म्हणतात ना, ‘स्वतःचे घर जळत असतांना आपण दुसर्याच्या घरावर पाणी मारायला नको.’
यामुळेच पाकिस्तानची अंतर्गत राजकीय परिस्थिती फार वेगाने खालावली आणि शेवटी जे होणार होते ते घडलेच. पाकिस्तान राजकीय अराजकाकडे वाटचाल करू लागला आणि आज पाकिस्तानकडे कोणतेही स्पष्ट राजकीय बहुमत नसतांनासुद्धा पाक लष्करी हस्तक्षेपाकडे वाटचाल करत आहे. याचा परिणाम पाकिस्तानवर तर होईलच; पण भारताला या संधीचे सोने कसे करून घेता येईल ? या दृष्टीकोनातून विचार होणे आवश्यक आहे.
२. भारतावर होणारे परिणाम
अ. प्रादेशिक अस्थिरता : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील कोणताही संघर्ष प्रादेशिक अस्थिरतेस कारणीभूत ठरू शकतो. याचा परिणाम प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भारताच्या सुरक्षा आणि आर्थिक हित यांवर होऊ शकतो. भारताचे अफगाणिस्तानशी जवळचे आणि ऐतिहासिक संबंध आहेत. त्यामुळे भारताने अफगाणच्या पायाभूत विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे; म्हणूनच अफगाणिस्तानातील अस्थिरता भारताच्या विकासकामांसाठी धोक्याची ठरू शकते, तसेच या संघर्षात पाकिस्तान यशस्वी होणे, म्हणजे आतंकवाद्यांसाठी आश्रयस्थान निर्माण होऊ शकते, ज्याचा सरळ परिणाम भारतावर होऊ शकतो.
आ. सुरक्षा चिंता : सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील संघर्षामुळे या प्रदेशात तणाव वाढू शकतो. ज्यामुळे सीमावर्ती भागांचे लष्करीकरण होण्याची दाट शक्यता राहील. त्यामुळे भारताला आपल्या पश्चिम सीमेवर विशेषत: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जवळील सीमाभागात स्वतःच्या सीमा सुरक्षा योजनांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते.
इ. राजनैतिक संबंधांवर परिणाम : अफगाण आणि पाकिस्तान संघर्षाचे स्वरूप अन् व्याप्ती यांनुसार भारताला स्वतःचे राजनैतिक संबंध काळजीपूर्वक ‘नेव्हिगेट’ (संचालन) करावे लागतील. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांशी भारताचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे या देशांतील तणावात भारताला कूटनीतीचे धोरण अवलंबवावे लागेल. यात मुख्यतः ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या उक्तीनुसार अफगाणच्या लढाऊंना छुप्या हाताने साहाय्य करून भारताने स्वहित साध्य करून घ्यावे हीच अपेक्षा !
ई. निर्वासित संकट : अफगाण आणि पाकिस्तान संघर्ष एका मर्यादेच्या पलीकडे गेला, तर भारतासह शेजारील देशांमध्ये निर्वासितांची संख्या वेगाने वाढेल. ज्याप्रमाणे तिबेटवरील चीनच्या आक्रमणानंतर तिबेटी निर्वासितांचा लोंढा आणि म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या निर्वासितांचा लोंढा हा या प्रदेशातील संघर्षांमुळे भारताने इतिहासात अनेकदा अनुभवला आहे. त्यामुळे विद्यमान संघर्षात भारताला निर्वासित लोंढ्यांची काळजी घ्यावी लागेल.
३. भारताला होणारे लाभ
अ. पाकिस्तानचे अस्थिरीकरण : सध्या चालू असलेला संघर्ष मुख्यतः ‘टीटीपी’शी असून या संघर्षात पाकिस्तानमधील कोणताही संभाव्य संघर्ष किंवा अशांतता पाकिस्तानला कमकुवत करू शकते अथवा पाकिस्तानची काश्मीर सीमेवर असलेली संपूर्ण शक्ती आणि सैन्य अफगाण सीमेवर वळवू शकते. यामुळे भारताला एक धोरणात्मक लाभ होऊ शकतो; कारण अफगाण आणि पाक संघर्ष हा पाकिस्तानसाठी वर्चस्वाची लढाई असल्याने पाकिस्तान कधीही नतमस्तक होणार नाही. त्यासाठी भारताच्या सीमेवरील पाकचे सैन्य न्यून करण्यासही तो सिद्ध होईल, अशी शक्यता दिसते.
आ. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव : ‘टीटीपी’ विरोधातील संघर्षामुळे पाकिस्तानवर त्याच्या सीमेतील आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला, तर त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे भारताला होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे पाकिस्तानला त्याच्या भूमीत सक्रीय असलेल्या आतंकवादी गटांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास भाग पाडले जाऊ शकते. ज्यामुळे भारताला सीमापार आतंकवादाचा असलेला धोका न्यून होऊ शकतो.
इ. प्रादेशिक गतीशीलता : ‘टीटीपी’विरोधातील संघर्षांमुळे उद़्भवणारी अस्थिरता दक्षिण आशियात प्रादेशिक समतोल पालटवू शकते. भारताने योग्य कूटनीती केल्यास या पालटांचा लाभ पाकिस्तानच्या विरुद्ध स्वतःची स्थिती मजबूत करण्यासाठी किंवा अफगाणिस्तान आणि इतर शेजारील देशांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी कामी येऊ शकते.
ई. आतंकवादविरोधी सहकार्य : अफगाण आणि पाकिस्तान संघर्षामुळे आतंकवादाच्या धोक्याचे जागतिक स्वरूप अधोरेखित केले, तर आतंकवादविरोधी प्रयत्नांमध्ये वाढलेले आंतरराष्ट्रीय सहकार्य अन् समर्थन यांचा भारताला लाभ होऊ शकतो.
उ. अफगाणिस्तानशी सुरक्षा सहकार्य : भारताचे अफगाणिस्तानशी धोरणात्मक हितसंबंध आहेत, ज्यामध्ये स्थैर्य, विकास आणि आतंकवादाचा प्रतिकार करणे यांचा समावेश आहे. अफगाण आणि पाकिस्तान संघर्षामुळे भारत अन् अफगाणिस्तान यांच्यामधील सुरक्षा सहकार्य वाढू शकते; कारण दोन्ही देश पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी आक्रमणांमुळे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे भारत आणि अफगाण एकत्र येऊन पाकिस्तानला ठेचू शकतात.
सर्वांत महत्वाचे म्हणजे अफगाण आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्षातून भारतासाठी संभाव्य लाभ असू शकतात; परंतु परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे अन् परिणाम अनिश्चित आहेत. त्यामुळे भारताला त्याच्या शेजारच्या देशांच्या अस्थिरतेचा, जोखीम आणि आव्हाने यांचाही सामना करावा लागेल. त्यामुळेच या संघर्षाकडे भारताचा दृष्टीकोन सूक्ष्म आणि बहुआयामी असण्याची अपेक्षा आहे.’
– श्री. विलास एन्. कुमावत, साहाय्यक प्राध्यापक, संरक्षण शास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (२३.३.२०२४) अफगाणिस्तानने पाकमध्ये केलेल्या आक्रमणानंतर झालेली हानी
संपादकीय भूमिकाभारताने शेजारी देशांच्या अस्थिरतेचा सामना करतांना स्वतःचा दृष्टीकोन राष्ट्रहितार्थ बहुआयामी ठेवावा, ही अपेक्षा ! |