गोरेगाव (बदलापूर) येथील धक्कादायक घटना !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2023/11/01161851/murder_news_320.jpg)
ठाणे, २६ मार्च (वार्ता.) – खंडणीसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना बदलापूर-कर्जत मार्गावरील गोरेगाव येथे घडली. या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना कह्यात घेतले होते. यासाठी सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. (धर्मांधांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नाही, हेच या घटनेतून सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ? – संपादक)
घराच्या बांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याने दोन्ही आरोपींनी २४ मार्च या दिवशी घराशेजारी रहाणार्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. त्याच रात्री ९ च्या सुमारास मुलगा बेपत्ता झाला. त्याचे नातेवाईक आणि गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. त्याच वेळी मुलाच्या वडिलांना भ्रमणभाष आला. ‘तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यात २३ लाख रुपये द्या’, असे सांगून भ्रमणभाष बंद करण्यात आला. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी कुळगाव पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी भ्रमणभाषसंचाचे ‘लोकेशन’ (ठिकाण) शोधून आरोपींना अटक केली. आरोपींच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यातील गोणीत मुलाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.