पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘देशाचे निर्माणकर्ते’ (‘नॅशनल क्रिएटर्स’) म्हणून चांगल्या क्षेत्रात कार्य करणारे काही युवक आणि युवती यांचा सत्कार केला. सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्या युवक-युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे पुरस्कार देण्याची संकल्पना पंतप्रधान मोदींच्या मनात निर्माण होणे, हेच त्यांना ‘भविष्यात भारत कसा अपेक्षित आहे ?’, याचे दर्शन घडवते. त्यांना ‘ऊर्जायुक्त युवकांचा भारत घडवायचा आहे’, असे या कार्यक्रमातून लक्षात आले. नवीन भारताविषयी जागरूकता निर्माण करणारे ‘न्यू इंडिया चॅम्पियन’ (नवीन भारताचे विजेते) म्हणून ‘अभी’ हा युवक आणि ‘न्यू’ ही युवती यांना गौरवण्यात आले. ते भारतातील चांगल्या अन् सकारात्मक गोष्टी नव्या पिढीसमोर अन् जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचा इतिहास अतिशय वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनातून मांडणार्या कीर्तिका गोविंदस्वामी यांना गौरवण्यात आले. ‘तरुण वयातील मुलामुलींना भारताच्या महानतेविषयीच्या गोष्टी आवडतात’, असे निरीक्षण त्यांनी या वेळी सांगितले. योगाभ्यासाविषयी जागृती करणारे रणवीर अहुवालिया यांचा सत्कार करतांना मोदींनी ‘प्रत्येकाने आवश्यक तेवढी पुरेशी झोप घेतली पाहिजे’, असे आवाहन केले.
‘ग्रीन चॅम्पियन ॲवॉर्ड’ (चिरंतन विजेता पुरस्कार) ‘इस्रो’मध्ये कार्यरत असणार्या पांकिती पांडे यांना दिला गेला. पर्यावरण आणि जीवनशैली याविषयी काम करणार्या पांकिती या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू निर्माण करतात. त्या म्हणाल्या की, ‘आपण दुसर्यांनी पालटण्याची अपेक्षा करतो; पण आपण आपल्यात पालट करणे कठीण असते. आपल्या कचर्याच्या डब्याचे परीक्षण करावे’, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. ‘आपले जीवनच पर्यावरणपूरक असले पाहिजे’, असे त्यांना पुरस्कार देतांना मोदी यांनी सांगितले. ‘बेस्ट क्रिएटर ऑफ सोशल चेंज’ (सामाजिक पालट घडवणारे सर्वाेच्च नवनिर्माते) या पुरस्काराने प्रसिद्ध आध्यात्मिक कथाकार जया किशोरी यांना सन्मानित करण्यात आले. त्या म्हणाल्या, ‘‘अध्यात्माचे ज्ञान लहानपणापासूनच आवश्यक आहे. ती वृद्धपणी करायची गोष्ट नाही.’’ ‘बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर’ (उत्कृष्ट प्रवास निर्माते) म्हणून कामया जानी यांना चांगल्या सहलीच्या चित्रांकनासाठी सन्मानित केले गेले. ‘हेरिटेज फॅशन आयकॉन ॲवॉर्ड’ (परंपरेची नवरुढी निर्माण करणारा आदर्श पुरस्कार) जानवी सिंग यांना प्रदान करण्यात आले. ती भारतीय संस्कृती आणि शास्त्र यांच्या विकासासाठी प्रयत्नरत आहे. सुरेल आवाजात भारतीय भाषांत भक्तीगीते गाणार्या ‘कल्चरल मेसेंजर’ (संस्कृतीवाहक) म्हणून लोकप्रिय मैथिली ठाकूर हिचा सत्कार करण्यात आला. वरील कार्यक्रमाद्वारे देशाच्या युवा पिढीला चांगले कार्य करण्याची स्फूर्ती नक्कीच मिळेल, अशी आशा आहे !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.