पणजी, २४ मार्च (वार्ता.) – प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा, अशी मागणी ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा हिंदी चित्रपट २२ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘वीर सावरकर युवा मंच’ ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूल्यांवर आधारित आणि समाजात अविरतपणे कार्य करणारी संस्था आहे. वीर सावरकरांची कार्य गाथा, देशासाठी त्यांनी केलेला संघर्ष आदी सर्व गोष्टी सध्याची पिढी, विद्यार्थीवर्ग आणि सर्व सामान्य नागरिक यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या युवा पिढीने वीर सावरकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशभक्ती वाढवली पाहिजे.
सौजन्य : ZEESTUDIOS
वीर सावरकर यांच्याविषयी योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी विनाकारण निर्माण केल्या जाणार्या वादांना चाप बसेल. यासाठी सर्व सामान्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य दाखवावा.
‘वीर सावरकर युवा मंच’चे अध्यक्ष रामकृष्ण दळवी आणि मंचचे माजी अध्यक्ष विजय होबळे यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.