ग्राहक संतप्त !
मार्चअखेर आले म्हणून वीजदेयक वसुलीसाठी तगादा लावणारे असंवेदनशील वितरण आस्थापन !
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मारुल हवेली वीज वितरण आस्थापनेच्या अधिकार्यांकडून मुदतपूर्व वीजदेयके वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे. आर्थिक वर्षाअखेर असल्यामुळे हे पाऊल उचलले जात असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी वीज वितरण आस्थापनाच्या या कृतीमुळे संतप्त झाले आहेत.
मारुल हवेली विभागातून मारुल हवेली, मरळी, ढेबेवाडी आदी भागांचे कामकाज चालते. हवामानातील पालट, प्रचंड उकाडा यामुळे वीजेची मागणी प्रचंड आहे. त्यातच पाण्याची ओरड, विजेचा लपंडाव यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच आर्थिक वर्षाअखेर असल्यामुळे वीज वितरणचे कर्मचारी वीजदेयकाची मुदत संपूण्यापूर्वीच ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी येत आहेत. इतर वेळेला वीजपुरवठा खंडीत झाल्यास किंवा वीजपुरवठ्यात काही अडचण निर्माण झाल्यास कर्मचारी वेळेवर येत नाहीत; मात्र मार्चमध्ये मुदतपूर्व वसुलीसाठी अगदी वाड्यावस्त्यांवर पोचतात. ग्राहकांनी ऑनलाईन वीज भरले किंवा नाही, हे विचारण्याचेही कष्ट वीज कर्मचारी घेतांना दिसत नाहीत. ‘अगोदर वीज वितरण व्यवस्था चांगली करून मुदतपूर्व वीजदेयके वसुलीचा तगादा थांबवला पाहिजे’, अशी अपेक्षा पाटण तालुक्यातील सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.