२९० मीटर रुंद पात्रात वाशिष्ठी नदीला नेसवली साडी !

  • कोकणातील पहिलाच कार्यक्रम

  • नदीला साडी नेसवण्यासाठी लागल्या ६५ साड्या

गुहागर – वाशिष्ठी नदीचा उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास जैेवविविधतेने नटलेला आहे. या प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जलपर्यटन, जलमार्गाने वाहतूक, असे वेगवेगळे विषय जोडले पाहिजेत. त्यातून या नदीच्या तिरांवरील गावे आपण समृद्ध करू शकतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाकडे आपण पाहिले पाहिजे,असे प्रतिपादन कोकण अभ्यासक, तथा पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पत्रकार श्री. धीरज वाटेकर यांनी केले. ते तालुक्यातील परचुरी येथे बोलत होते.

तालुक्यातील परचुरीमध्ये पर्यटन व्यावसायिक श्री. सत्यवान देर्देकर, डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने १८ ते २१ मार्च असे ४ दिवस ‘हाऊस बोटी’त भागवत पुराण आणि मत्स्यपुराण यांचे पारायण करण्यात आले. २२ मार्चला ‘जागतिक जलदिन’ असल्याने सकाळी वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले.

नदी प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी नाते घट्ट करणे आवश्यक ! – धीरज वाटेकर

वाशिष्ठी नदीची माहिती सांगतांना धीरज वाटेकर म्हणाले की, आज जागतिक जलदिन आहे. ही संकल्पनाही चिपळूणचे मूळ रहिवासी असलेल्या माधवराव चितळे यांनीच संयुक्त राष्ट्र संघात प्रथम मांडली होती. वर्ष १६३७ मध्ये डच लोकांनी आणि स्वातंत्र्यानंतर वर्ष १९७१ मध्ये गोरे नावाच्या अधिकार्‍यांनीही वाशिष्ठीचा अभ्यास केला. या अभ्यासातून येथे देशातील मोठे बंदर विकसित करता येईल, असा निष्कर्ष निघाला होता. खासदार बापूसाहेब परुळेकर यांनी वाशिष्ठी नदीच्या विकासाचे सूत्र लोकसभेतही मांडले होते.

वाशिष्ठीच्या नदीपात्रात समुद्राला जवळ असलेले दाभोळ बंदराचे विस्तारीकरण उद्योगांची जोड असे वेगवेगळी सूत्रे चर्चेत आली; परंतु त्यानंतर दिघी बंदरचा विकास झाला. कोरोना काळातील दळणवळण बंदीमध्ये वाशिष्ठीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर आजपर्यंत न दिसणारे अनेक जलचर याच वाशिष्ठीत दिसून आले. पाण्याची गुणवत्ता सुधारली. नदीचे सौंदर्य पहाता आले. नदीचे हे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल. कोकणात प्रथमच त्याचा प्रारंभ या  कार्यक्रमाने झाला आहे.

यानंतर श्री. धीरज वाटेकर यांनी उपस्थितांना नद्या स्वच्छ प्रदूषणमुक्त करण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली. वाशिष्ठी नदीला नेसवलेल्या साड्या या कार्यक्रमानंतर प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील ८० ग्रामस्थ आणि कराड, नाशिक, पुणे येथून ३० पर्यटक उपस्थित होते.

वाशिष्ठी नदी

अशी नेसवली वाशिष्ठी नदीला साडी !

परचुरीमध्ये वाशिष्ठी नदीचे पात्र २९० मीटर रुंद आहे. एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवण्यासाठी ६५ साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना गाठवून लांब पट्टा सिद्ध करण्यात आला होता. एका किनार्‍यावरून हा पट्टा एका बोटीद्वारे सोडवत दुसर्‍या किनार्‍यापर्यंत नेण्यात आला. नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून नदीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली.