निवडणूक आयोगाकडून कारवाईसाठी ‘ॲप’ची निर्मिती !
मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताचा भंग करणार्यांवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येईल, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे; मात्र मतदारांना त्यासाठी ‘ॲप’वर तक्रार प्रविष्ट करावी लागणार आहे. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष ‘सिव्हील सिटीझन ॲप’ची निर्मिती केली आहे.
‘ॲप’वर तक्रार करतांना आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडणे, घटनेचा तपशील देणे यांसह स्थान, वेळ यांची माहिती द्यावी लागणार आहे. यासह छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. यामध्ये भ्रमणभाषद्वारे ‘लोकेशन’ (ठिकाण) पाठवल्यास त्या आधारे निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळी पोचेल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. यावर प्रत्यक्ष कारवाई काय होते, हे येत्या लोकसभा निवडणुकीतच कळेल.
असा ‘ॲप डाऊनलोड’ करा !
‘अँड्रॉईड मोबाईल’मधील ‘गुगल प्ले स्टोर’ आणि ‘आयफोन’मधील ‘ॲप स्टोर’ यांमध्ये ‘सीव्हिजिल (cVIGIL)’ सर्च करून ते ‘डाऊनलोड’ करता येणार आहे. ‘ॲप’ उघडून भ्रमणभाष क्रमांक, पत्ता, मतदारसंघ यांची माहिती यामध्ये भरावी लागणार आहे. ही माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ हा पर्यायावर ‘क्लिक’ केल्यावर तक्रार देता येणार आहे.