Maharashtra Political Parties : मागील ८ वर्षांमध्ये हिशेब न देणार्‍या महाराष्ट्रातील २१९ राजकीय पक्षांची मान्यता रहित !

राजकीय कुरघोडी करण्यासाठी निवडणुकीपुरते स्थापन करण्यात येत आहेत पक्ष !

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोडी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अनेक पक्ष स्थापन केले जात आहेत. निवडणूक झाल्यानंतर हे काही काम करत नसले, तरी ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता प्राप्त केल्यामुळे निवडणूक आयोगाला या पक्षांकडे वार्षिक लेखा परीक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मागील ८ वर्षांत अशा प्रकारे निवडणूक आयोगाकडे हिशेब सादर न करणार्‍या महाराष्ट्रातील २१९ राजकीय पक्षांची मान्यता रहित करण्यात आली आहे.

१. लोकशाहीमध्ये कोणतीही संस्था किंवा संघटना यांना निवडणूक लढवायची असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती यांची पूर्तता करून ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळवता येते आणि निवडणूक लढवता येते.

२. ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता प्राप्त झाल्यांनतर त्या पक्षाने निवडणूक झाल्यानंतर १ वर्षाच्या आत निवडणूक आयोगाकडे वार्षिक लेखा परीक्षण आणि आयवर विवरण सादर करणे बंधनकारक आहे; मात्र तात्पुरते स्थापन करण्यात आलेले बहुतांश पक्ष ही माहिती निवडणूक आयोगाला देतच नाहीत. त्यामुळे या पक्षांनी अहवाल सादर करावेत यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जातो. त्यासाठी त्यांना आणखी १ वर्षाची मुदतही दिली जाते.

३. बहुतांश राजकीय पक्ष तात्पुरते राजकीय कुरघोडी करण्यासाठी स्थापन झालेले असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतात. निवडणूक आयोगाने मागील ८ वर्षांत ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता रहित केलेले बहुतांश पक्ष त्याच प्रकारचे असल्याचे आढळून आहे.

संपादकीय भूमिका

अशांची मान्यता रहित करण्यासह संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !