जानेवारीत अचानक ‘सोशल मिडिया’मधून (सामाजिक माध्यमातून) पुण्यातील एका प्रथितयश शाळेत घडलेल्या घटनेसंबंधी लेख वाचनात आला. तो लेख त्या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असणार्या व्यक्तीने लिहिलेला होता, असे ते लिखाण वाचतांना लक्षात आले. त्या व्यक्तीने तसा धावता उल्लेखही केलेला होता. त्या शाळेतील ७ वीच्या वर्गातील काही मुलांनी त्यांच्याच वर्गातील एका मुलाचा वर्गातील आपल्या मित्रमैत्रिणींसमोर विनयभंग केला. हे सगळे फक्त २ तासिकांच्या मधल्या काळात, म्हणजे एक शिक्षक वर्गातून जाऊन पुढच्या तासिकेचे शिक्षक वर्गात येण्याआधी घडले. घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासन यांच्याकडून झाला; पण ‘क्लोज सर्किट टीव्ही फुटेज’ अन् पीडित मुलाच्या पालकांनी विषय लावून धरल्याने नाईलाजास्तव शाळेला घटनेची नोंद घेऊन कारवाई करावी लागली. आता या घटनेकडे आपण केवळ न केवळ आपल्या समाजातील विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार आणि त्यांचे भवितव्य या एकाच दृष्टीकोनातून विचार करूया.
१. समाजातील बहुतांश घटकांना सांस्कृतिक भेसळीची जाणीव नसणे
माझ्या मते यात सगळेच पीडित आहेत. ज्या मुलाचा विनयभंग झाला तो मुलगा (अशा अनुभवातून जो ट्रॉमा आणि त्यामुळे होणारी मानसिक हानी), ज्यांनी विनयभंग केला ती मुले (कारण त्यांना आपण नक्की काय करत आहोत, याची स्पष्ट कल्पना असावी, असे वाटत नाही आणि असली, तर तेही त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अधिकच हानीकारक आहे), जी मुले ही सगळी घटना पहात होती (त्यांच्या मनावर झालेला परिणाम), संबंधित शिक्षक (जे दूरगामी होणार्या हानीचा विचार न करता फक्त तात्पुरती उपाययोजना करत होते…असा प्रसंग त्यांच्या मुलांवरही किंवा त्यांच्यावरही उद्भवू शकतो, याची जाण नसलेले), संबंधित मुख्याध्यापक आणि संस्थाचालक (जे फक्त शाळेच्या प्रतिष्ठेचा विचार करत होते; पण ‘शाळेत त्यांच्याकडून संस्कार कमी पडत आहेत’, असा विचार त्यांच्या मनात आला असेल का ? त्या दृष्टीने काही पावले उचलली का ?), या सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक (आपल्या मुलांची शारीरिक सुरक्षितता आणि त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे, याची झालेली जाणीव) अन् सरतेशेवटी पूर्ण समाज (ही बातमी वाचल्यावर आपला समाज नक्की कोणत्या भविष्याकडे वाटचाल करतो आहे ? असा प्रश्न पडल्याने). हे सगळे तंत्रज्ञान (भ्रमणभाष, टीव्ही, समाजमाध्यमे, ओटीटी प्लॅटफॉर्म्स) आणि त्यामुळे निर्माण सांस्कृतिक भेसळीच्या परिणामाने हे सगळे पीडित आहेत. यातील बहुतांश घटकांना अशा प्रकारे काही घडते आहे, याची पुसटशी जाणीवही नाही.
२. मुलींना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जावे ? याविषयी पालकांनी सारासार विवेक बुद्धी न वापरणे
मी फेसबुकवर एका ‘ग्रुमिंग (प्रशिक्षण) ॲकॅडमी’चा व्हिडिओ पाहिला. त्यात एक ३० ते ३५ वर्षे वयोगटातील माणूस ५ ते ९ वर्षे वयोगटातील मुलींना ‘मॉडेलिंग’साठी ‘कॅटवॉक’ (चालण्याची एक पद्धत) कसे करायचे ? त्यासाठी स्वतःचे ‘बॉडी पॉश्चर’ (शरिराची स्थिती) कसे ठेवायचे ? आपल्यात मुळात नसलेला आत्मविश्वास चेहर्यावर उसना कसा आणायचा ? इत्यादी गोष्टी त्या मुलींना ठिकठिकाणी हात लावून शिकवत होता. या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करणार्यांपैकी बर्याच जणांना ‘त्या माणसाचा धर्म खटकत होता आणि त्या मुलींचा धर्म कोणता ?’, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. एक क्षण त्याचा धर्म बाजूला ठेवला, तर ज्या मुलींच्या पालकांनी इतक्या लहान वयातील आपल्या मुलींना अशा प्रकारे निर्बुद्धपणे एका परक्या पुरुषाच्या हवाली केले आहे, हेच मुळात खटकणारे आहे. या पालकांच्या सारासार विवेक बुद्धीला अर्धांगवायूचा झटका आलेला असावा, असे दिसते. त्यामुळे त्यांना फक्त ‘मॉडेलिंग’च्या जगतातील ‘ग्लॅमर’ (अत्यंत आकर्षक सौंदर्य) (?), प्रसिद्धी (?), पैसा (?) इत्यादी दिसत असल्याने आपल्या अतिशय लहान मुलींना (ज्या वयात त्या मुलींनी खेळायचे, बागडायचे, नैसर्गिकरित्या वाढायचे) नको त्या गोष्टींचे प्रशिक्षणाच्या नावाखाली शिकवण देऊन त्यांच्या चेहर्यावर ‘मेकअप’ची लिपापोती करून कॅमेर्यासमोर त्यांना कळत नसलेल्या गाण्यांवर, अर्थ कळत नसलेल्या देहबोलीद्वारे नाचायला सिद्ध करत आहेत. यामध्ये असलेले धोके यांना माहिती नाहीत ? कि स्वत:च्या सुप्त इच्छा आपल्या या लहान मुलांद्वारे पूर्ण करण्याकडे पालक इतके झुकलेले आहेत की, स्वतःची लहान मुले पणाला लावण्यातही त्यांना काही वाटत नसावे ?
३. लहान मुलांना फालतू प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवण्याऐवजी पारंपरिक गुरुकुलपद्धतीत कला शिकण्यास पाठवा !
मुळात अशा प्रकारे लहान वयात मुलामुलींना प्रशिक्षण देणे, म्हणजे रासायनिक इंजेक्शन्स देऊन कच्ची फळे पिकवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. सध्या समाजात लहान मुलांचे लैंगिक शोषण (विविध मार्गांनी) करणार्यांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. पालक अशा प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सोडून स्वतःच्या मुलांचे लैंगिक शोषण करण्यास प्रोत्साहन देत आहेत. यामुळे आपण आपल्या मुलांना ‘पेडोफिल्स’च्या (लहान मुलांशी लैंगिक चाळे करणार्या १८ वर्षे वयावरील प्रौढ व्यक्तींच्या) हातात सहजपणे देत आहोत. यात मुलांच्या मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो ? याचा या पालकांनी विचार करावा. मुलांना नैसर्गिकरित्या वाढू द्या. त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ अतिशय निकोपतेने होऊ द्या. एवढी कसली घाई आहे तुम्हाला ? आपल्या मुलांना लहान वयात झळकवण्याची अहमहमिका लागलेली आहे. गायन, नृत्य या कला अशा आहेत की, ज्यात तुम्ही लहान वयापासून मुलांना ते शिकवले, तर पुढे वयात आल्यावर ते उत्तम गायक किंवा नर्तक बनतील; पण त्यातही एक सुसंस्कृतपणा आहे. गायन आणि नृत्य शिकण्यासाठी पारंपरिक गुरुकुलपद्धत आहे. त्या गुरुकुलपद्धतीचे संस्कार या असल्या फालतू प्रशिक्षण ॲकॅडमीमध्ये अजिबात नसतात. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा परिणाम उलट होऊ शकतो. मुलांमध्ये त्यांच्या ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’विषयी (लैंगिक आवडीविषयी) गोंधळ निर्माण होऊ शकतो. बॉलीवूडच्या नट-नट्यांकडे बघा. त्यांच्यातील ९० टक्के अमली पदार्थांच्या आहारी (ड्रग ॲडिक्शन), ‘अल्कोहोलिझम’ (मद्पान), निराशा (डिप्रेशन) याने पीडित असतात. यांच्या वैवाहिक जीवनात घोळ असतात. जनतेला फक्त त्यांचे ‘ऑनस्क्रिन कॅमेर्या’तील (चित्रपटात दिसणारे) बंदिस्त केलेले आणि दाखवलेले आयुष्य दिसते; पण वस्तूस्थिती फार फार वेगळी असते.
४. पालकांनी मुलांना नाती आणि संस्कृती दोन्ही जपायला शिकवावे !
पालकांनी त्यांच्या मुलांना नैसर्गिकरित्या वाढू द्यावे. त्यांचा निरागसपणा जपावा. त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ निकोपतेने होऊ द्यावी. आपल्याला जर एक मुल वाढवणे, म्हणजे आई आणि वडिल दोघांचीही २० वर्षांचे एकत्रित उत्तरदायित्व आहे. असे समजत नसेल, तर समाजावर कृपा करावी आणि मुले जन्माला घालू नयेत. नुसते पैसे कमावले आणि मुलांना भरपूर ‘मटेरिॲलिस्टीक’ (भौतिकवादी) गोष्टी देऊ केल्या, म्हणजे आपले पालक म्हणून उत्तरदायित्व संपले, असे नसते. ‘आम्हाला आमच्या लहानपणी मिळाले नाही; म्हणून आम्ही सगळे आमच्या मुलांना पुरवू’, या मानसिकतेमुळे पालक त्यांच्या मुलांचे आणि पर्यायाने स्वत:चीही आयुष्यभराची हानी करून घेत आहेत. पूर्वी काही पालक ‘तू आमचे ऐकले नाही, तर तुला उपाशी ठेवू. तुला अमुक देणार नाही’ इत्यादी सांगून किंवा उलट म्हणजे ‘तू आमचे ऐकले, तर हे देऊ’; ‘तू अमुक केले, तर ते देऊ’, ‘इतके गुण मिळवले, तर ही भेटवस्तू (गिफ्ट) मिळेल’, इत्यादी बोलून मुलांना वाढवत होते. तेही चुकीचेच आहे.
पालक म्हणून, एक कुटुंब म्हणून पालकांनी मुलांना शारीरिक, तसेच भावनिक सुरक्षा पुरवणे, हे कर्तव्य आहे. पालकांनी मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांची मुले नाती आणि संस्कृती दोन्ही जपायला कशी शिकतील, हे पहावे. होणार्या बाळाचे पूर्ण दायित्व हे दोघांचे आहे ना ? कि फक्त कुणा एकट्याचे ? पालकांनो वेळीच जागे व्हा…..
सावध रहा !
– डॉ. अपर्णा लळिंगकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य, पुणे. (१५ मार्च २०२४)
(डॉ. अपर्णा लळिंगकर यांच्या फेसबुकवरून साभार)