बेलफळ जसे शिवपूजनात महत्त्वाचे आहे, तसेच विष्णुपूजनात महत्त्वाचे फळ म्हणजे आवळा ! तो देऊन कुणी कोहळा काढायला गेलाच, तरी स्वतःचीच हानी करून घेईल; कारण आवळा हा वय:स्थापन म्हणजेच ‘डिजनरेटिव्ह चेंजेस’ची (degenerative changes) (शरिराची झीज) गती न्यून करण्यास सर्वोत्तम आहे !
दाईप्रमाणे (स्त्रीप्रमाणे) तो स्वतःचे पोषण करत असल्याने त्याला दाईच्याच अर्थी ‘धात्री’ असा पर्यायी शब्द आयुर्वेदाने योजला आहे. मृत्यूभय असलेल्या स्थितीत ‘स्वर्णधात्रीयोग रसायन’ सुश्रुताचार्यांनी सांगितले आहे. उत्तम आवळा रसरशीत आणि पारदर्शक असतो. त्याची पारदर्शकता उदाहरण म्हणून साहित्यात वापरली गेलेली दिसते. गोस्वामी तुलसीदास यांनी महर्षि याज्ञवल्क्य आणि महर्षि भरद्वाज यांचे वर्णन करतांना ‘रामचरितमानस’मध्ये म्हटले आहे, ‘जानहिं तीनि काल निज ग्याना । करतल गत आमलक समाना ।’ तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके पारदर्शक असे भूत, वर्तमान आणि भविष्य यांचे ज्ञान या मुनींना आहे.
वनस्पतीशास्त्र आणि पाश्चात्त्य वैद्यकानुसार आवळ्यात ‘अँटीडायबिटिक’ (मधुमेहविरोधी), ‘हायपोलिपिडेमिक’ (रक्ताच्या सीरममधील लिपिडची गुणवत्ता न्यून करणे), ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीइंफ्लेमेटरी’ (दाहकविरोधी), ‘अँटीऑक्सिडेंट’, ‘हेपेटोप्रोटेक्टिव्ह’ (यकृत हानी प्रतिबंधक) आणि ‘अँटीइमेटिक’ (उलट्या प्रतिबंधक) असे गुण असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
२० मार्च २०२४ या दिवशी ‘आमलकी एकादशी’ झाली. ताजा आवळा किंवा तो उपलब्ध न झाल्यास आवळ्याचे चूर्ण हातात घेऊन ‘विष्णुसहस्रनामा’चा एक पाठ करून त्याचे सेवन अवश्य करा.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२०.३.२०२४)