‘इंडी’ आघाडीकडून हिंदूंनाच केले जात आहे लक्ष्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • सेलम (तमिळनाडू) येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल !

  • राहुल गांधी यांच्या ‘हिंदु धर्मातील शक्तीला आम्ही नष्ट करू’, या वक्तव्यावर पंतप्रधानांची प्रखर टीका !

सेलम (तमिळनाडू) – द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रविड प्रगती संघ) आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भ्रष्टाचार अन् घराणेशाही या त्यांच्यातील समान गोष्टी आहेत. ‘इंडी’ आघाडीच्या मुंबईत झालेल्या सभेत त्यांची हिंदुविरोधी योजना उघड झाली. ‘हिंदु धर्मातील शक्तीस आम्ही नष्ट करू’, असे ते (राहुल गांधी) उघडपणे म्हणाले. हिंदु धर्मातील शक्ती म्हणजे काय, ते तमिळनाडूतील सर्वांना ठाऊक आहे. तमिळनाडूत देवतांच्या अवतारास शक्तीस्वरूप मानले जाते. कांची कामाक्षी अम्मा, मदुराई मीनाक्षी अम्मा, समयापूरम् मरियम्मा देवी यांची राज्यात मोठी मंदिरे आहेत. याखेरीज हिंदूंमध्ये ‘मातृशक्ती’, ‘नारीशक्ती’ अशीही मान्यता आहे. ही शक्ती नष्ट करण्याची भाषा ते करत आहेत; परंतु या प्रयत्नात तेच राजकीयदृष्ट्या नष्ट होतील, अशी प्रखर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. ते येथे आयोजित एका सभेला संबोधित करत होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या मुंबईतील सभेत म्हटले होते की, हिंदु धर्मात ‘शक्ती’ नावाची संकल्पना आहे. आम्हीसुद्धा एका शक्तीशीच युद्ध करत आहोत.’ या माध्यमातून त्यांनी केंद्रशासनावर आरोप केला की, मतदानयंत्रांवर शासनाचे नियंत्रण आहे. हिंदु धर्मावर केलेल्या या अप्रत्यक्ष टिप्पणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,

सौजन्य Narendra Modi

१. ‘इंडी’तील घटक पक्ष, विशेषकरून काँग्रेस आणि द्रमुक यांचे नेते सातत्याने अन् जाणीवपूर्वक केवळ हिंदु धर्मियांच्या श्रद्धांचा अवमान करत आहेत. अन्य धर्मियांच्या श्रद्धांच्या विरोधात बोलण्याचे त्यांच्यात धैर्य नाही.

२. ही मंडळी हिंदूंच्या विरोधात अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक विधाने करतात.

३. कमालीचा भ्रष्टाचार आणि एकाच कुटुंबाची सत्ता यासाठी काँग्रेस अन् द्रमुक हे पक्ष ओळखले जातात.

संपादकीय भूमिका 

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !