बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

बिकानेर (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली. याविषयीचे सविस्तर वृत्त येथे देत आहोत.

देशविरोधी हलाल प्रमाणपत्राचा विषय विधानसभेत मांडणार ! – आमदार जेठानंद व्यास, भाजप

भाजपचे आमदार श्री. जेठानंद व्यास यांची नुकतीच समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी भेट घेतली. या वेळी श्री. जाखोटिया यांनी श्री. जेठानंद व्यास यांना हिंदु जनजागृती समिती करत असलेले राष्ट्र-धर्मविषयक कार्याची आणि समाजाला विविध माध्यमातून देत असलेल्या धर्मशिक्षणाची माहिती दिली, तसेच हलाल प्रमाणपत्राच्या देशद्रोही षड्यंत्राची माहिती देऊन समितीने प्रकाशित केलेले ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथही त्यांना भेट म्हणून दिला. या वेळी आमदार जेठानंद व्यास यांनी ‘हा प्रश्न गंभीर असून येत्या विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर आम्ही आवाज उठवू’, असे आश्वासन दिले. या वेळी धर्मप्रेमी श्री. संजय अरोरा उपस्थित होते.

‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या बिकानेरचे जिल्हाध्यक्ष वेद व्यास यांची सदिच्छा भेट !

बिकानेर – देश आणि धर्म यांविषयी गीतांच्या माध्यमातून देशप्रेम जागवणारे ‘भारतीय जनता युवा मोर्चा, बिकानेर’चे जिल्हाध्यक्ष श्री. वेद व्यास यांची श्री. आनंद जाखोटिया यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. व्यास यांना समितीच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. या वेळी समितीच्या कार्याचे कौतुक करतांना श्री. वेद व्यास यांनी ‘मी समितीच्या कार्यशैलीने मी प्रभावित झालो आहे’, असे उद्गार काढले, तसेच या विषयावर बैठकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्याशी हलाल प्रमाणपत्राविषयीच्या षड्यंत्राविषयी चर्चा करण्यात आली.

बिकानेर येथील ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’च्या कुलगुरूंची घेतली भेट !

बिकानेर – ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. मनोज दीक्षित यांची श्री. आनंद जाखोटिया यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना समिती करत असलेल्या धर्मविषयक कार्याची माहिती दिली. ‘भविष्यात या विषयावर विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यात समितीला निमंत्रित करण्यात येईल’, असे त्यांनी या वेळी सांगितले.