मुंबई – ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने बनावट चकमक घडवून लखन भैया याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली. १९ मार्च या दिवशी न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना येत्या ३ आठवड्यांत मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने ८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी हा निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी १६ जणांनी याचिका केल्या होत्या. गुंडगिरी विश्वाशी घनिष्ट संबंधांमुळे प्रदीप शर्मा यांची कारकिर्द नेहमीच वादग्रस्त ठरली. वर्ष १९८३ मध्ये ते पोलीस दलात आले. लखन भैया बनावट चकमक आणि आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याप्रकरणी वर्ष २००८ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये प्रदीप शर्मा याने शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांमध्ये त्यांना अटक झाली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने त्यांचा जामीन संमत केला होता.
काय आहे प्रकरण ?
वर्ष २००६ मध्ये बनावट चकमकीत प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाने राम नारायण गुप्ता तथा लखन भैया या छोट्या राजन याच्या हस्तकाला ठार केले होते. छोटा राजन याचा हस्तक असल्याच्या कारणावरून पोलिसांनी लखन भैया याला ११ नोव्हेंबर २००६ या दिवशी नवी मुंबईतील वाशी येथे अटक केली होती; मात्र त्याच दिवशी सायंकाळी मुंबईतील वर्साेवा येथील नाना-नानी पार्कमध्ये पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत त्याची हत्या झाली. या प्रकरणी सत्र न्यायालयाने ११ पोलिसांसह अन्य ८ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली; मात्र प्रदीप शर्मा यांना निर्दाेष ठरवले. या विरोधात लखन भैया याच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाने वरील निर्णय दिला.