हिंदूंच्या घरांवर लावलेले भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्‍यांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषदेचे निवेदन

प्रतिकात्मक छायाचित्र

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – भगवा ध्वज हा हिंदूंच्या स्वाभिमानाचे प्रतीक असून त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. असे असतांना निवडणूक आयोगाचा चुकीचा दाखला देऊन काही शासकीय कर्मचारी खासगी जागेवरील, घरांवरील, तसेच सार्वजनिक ठिकाणचे भगवे ध्वज उतरवत आहेत. काही भगव्या ध्वजांवर मंदिर आणि देवता यांची चित्रे आहेत. जर भगवा ध्वज हा कोणत्याही पक्षाचे अधिकृत चिन्ह नाही, तर तो काढण्यात का येत आहे ? त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. तरी हिंदूंच्या घरांवर लावलेले भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्‍यांवर कारवाई करावी, तसेच जिथे चुकीची कारवाई झाली आहे, तिथे ते लावून द्यावे, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषदेच्या वतीने प्रांताधिकारी सौ. मौसमी बर्डे-चौगुले यांना देण्यात आले. यावर प्रांताधिकार्‍यांनी ध्वज उतरवण्याची कारवाई तात्काळ थांबवू, असे आश्वासन दिले. बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाकडून विरोध होत आहे, तरी या संदर्भात योग्य ते आदेश देण्यात यावेत, असेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रांताधिकारी सौ. मौसमी बर्डे-चौगुले (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या प्रसंगी विभाग सहसंयोजक श्री. सनतकुमार दायमा, जिल्हा संयोजक श्री. अमित कुंभार, सुरक्षाप्रमुख श्री. अमित पाटील, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री सुजित कांबळे, भाजप विस्तारक श्री. राजू भाकरे, बजरंग दल शहर संयोजक श्री. मुकेश चोथे, विश्व हिंदु परिषद शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ओझा, सर्वश्री रितेश खोत, दीपक तेलवे, ऋषिकेश पोवार यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. अमित कुंभार म्हणाले, ‘‘प्रशासन जर सर्वांसाठी समान आहे, तर केवळ हिंदूंच्या ध्वजांवरच कारवाई का ? अन्य धर्मियांचे लावलेले जे ध्वज आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही ?’’ यावर प्रांताधिकारी निरुत्तर झाल्या.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे संतापजनक !