संपादकीय : भारतीय नौदल – एक रक्षक शक्ती !

भारतीय नौदलाच्या ‘आय.एन्.एस्. कोलकाता’ आणि ‘आय.एन्.एस्. सुभद्रा’ या युद्धनौकांनी एका व्यापारी जहाजावर ताबा मिळवलेल्या समुद्री चाच्यांविरुद्ध (चोरांविरुद्ध) कारवाई केली. ही मोहीम ४० घंटे चालू होती. या कारवाईत ३५ समुद्री चोरांना भारतीय नौदलाने शरण येण्यास भाग पाडले. या कारवाईत जहाजावरील १७ जणांची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुटका केलेल्यांपैकी कुणालाही काहीही इजा झालेली नाही. भारतीय नौदलाची या वर्षातील ही आणखी एक मोठी कारवाई आहे. मुख्य म्हणजे ‘एम्.व्ही.रूईन’ या ज्या व्यापारी जहाजावरून नौदलाने कर्मचार्‍यांची सुटका केली, ते जहाज काही मासांपूर्वी सोमालियाच्या समुद्री चोरांनी चोरले होते. या जहाजाची माहिती भारतीय नौदलाला मिळाली आणि त्यांनी भारतीय किनार्‍यापासून २ सहस्र ६०० किलोमीटर एवढ्या आत जाऊन ही धाडसी कारवाई केली आहे.

नौदलाच्या यशस्वी कारवाया !

भारतीय नौदलाने मागील काही आठवड्यांमध्ये अनेक व्यापारी जहाजांना पश्चिम हिंद महासागरात समुद्री चोरांपासून वाचवले आहे. या मासाच्या प्रारंभीच इराणचा झेंडा लावलेल्या आणि ११ इराणी अन् पाकचे ८ कर्मचारी असलेल्या इराणी व्यापारी जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवले आहे. जानेवारीमध्ये मासेमार नौकेला सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवरील समुद्री चोरांपासून वाचवून पाकच्या १९ नागरिकांची सुटका केली होती. उत्तर अरबी महासागरातून लायबेरियाच्या जहाजाचे अपहरण होण्यापासून वाचवले आहे. लायबेरियाच्या आणखी एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन आक्रमणापासून त्याचे रक्षण केले आहे. अशा प्रकारे भारतीय नौदल हिंद आणि अरबी महासागर येथील समुद्री परिसरात एक मोठी ‘रक्षक शक्ती’ म्हणून उदयास येत आहे, यात शंकाच नाही. भारतीय नौदलाने या सर्व कारवायांमध्ये युद्धनौका, ‘सी १७’ लढाऊ विमाने आणि ‘मरिन कमांडो’ यांचा समावेश होता. भारतीय मरिन कमांडोंची थरारक प्रात्यक्षिके काही मासांपूर्वी कोकणातील तारकर्ली या समुद्र किनार्‍यावर झालेल्या नौदलाच्या एका कार्यक्रमात पहाण्यास मिळाली होती. खोल समुद्रातील सुटकेची कारवाई रक्ताचा एक थेंब न सांडता करणे किती कठीण असते ? याची आपल्याला थोडीफार कल्पना येऊ शकते. आतापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये संबंधित देशाचे जहाज, कर्मचारी, साहित्य, भारतीय नौदल या कशाचीही हानी झालेली नाही, हे लक्षात येते. उलट समुद्री चोरांवर ज्या आक्रमकतेने भारतीय नौदल कारवाई करते, त्यामुळे चोरांना माघार घ्यावी लागून सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करणे भागच पडते. येथेच भारतीय नौदलाचे कौशल्य दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाला व्यापारी अन् अन्य जहाजे यांचे रक्षण करण्याचे आदेश दिले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तर ‘भारतीय समुद्रातील जहाजांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातून शोधून काढून कारवाई करू’, अशी गर्जना केली आहे. तेव्हापासून भारतीय नौदलाकडून वेगवान आणि आक्रमक कारवाया करण्यात येत आहेत.

छत्रपती शिवराय नौदलाचे आदर्श !

आय.एन्.एस्. राजपूत

एरव्ही भारतीय नौदलाचे सामर्थ्य युद्धाच्या वेळी दिसून येते. ‘द गाझी अटॅक’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. वर्ष १९७१ मधील भारत-पाक यांच्यातील युद्धात समुद्रातील लढाईचा एक भाग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पाकिस्तानच्या नौदलाची ‘पी.एन्.एस्. गाझी’ ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ‘आय.एन्.एस्. राजपूत’ने अत्यंत नाजूक परिस्थितीत १८ दिवस समुद्राखाली राहून कौशल्याने कारवाई करत बुडवली होती. याच युद्धामध्ये पाकच्या कराची बंदरावर नौदल आणि वायूदल यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत कराची बंदराजवळील नौदलाचा संपूर्ण तळच बेचिराख केला होता. नौदलाच्या मार्‍यामुळे येथील तेलाच्या साठ्यांना लागलेली आग ८ दिवस धुमसत होती, म्हणजे भारतीय नौदल शत्रूवर थेट आक्रमण करण्याचे आणि त्याला नेस्तनाबूत करण्याचे, तसेच समुद्री युद्ध जिंकण्याची क्षमता राखते; मात्र त्याला आदेश देण्याची तेवढी कमतरता होती. ती कमतरता पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भरून काढली आहे. त्यामुळे ‘भारतीय नौदल स्वतःच्या असीम युद्धकौशल्याचे जगाला प्रदर्शन घडवत आहे’, असेच म्हणावे लागेल.

भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज !

भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. भारतीय नौदलाचा आधीचा ध्वज आणि बोधचिन्ह हा ब्रिटिशांच्या धर्तीवर, म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा सांगणारा होता. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेत सप्टेंबर २०२२ मध्ये नौदलाचा ध्वज आणि बोधचिन्ह यांमध्ये पालट करण्यात आले. नौदलाच्या नव्या बोधचिन्हातील ब्रीदवाक्य आणि त्यातील अष्टकोनाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली आहे. हा अष्टकोनी आकार म्हणजे आठही दिशांचे प्रतिनिधित्व करतो. ‘आठही दिशांनी भारतीय नौदलाचा दबदबा कायम राहो’, ही भावना यातून व्यक्त होते. छत्रपती शिवराय शत्रूचे आक्रमण होण्यापूर्वीच शत्रूवर आक्रमण करून विजयी होत. भारतीय नौदलाचा ध्वज आणि बोधचिन्ह यांमध्ये पालट केल्यापासून त्यांच्यातील आक्रमकता अन् विजिगीषु वृत्ती वाढली आहे, असेच दिसून येते.

नौदलाचा दरारा !

भारतीय युद्धनौकांनी हिंद महासागर, अरबी महासागर यांसह लाल समुद्र, सोमालियाच्या किनारपट्टीचा भाग येथे गस्त वाढवली आहे. धडक कारवायांमुळे एक प्रकारचा दरारा समुद्रात निर्माण झाला आहे. सोमालियातील समुद्री चोरांच्या कारवाया अनेक वर्षांपासून चालू आहेत. त्यांच्याकडून व्यापारी आणि मासेमार नौका यांचे अपहरण करणे, त्यांवर लुटमार करणे या घटना काही दिवसांआड घडत असतात. त्यामुळे व्यापारी नौकांवर एक प्रकारची दहशत होती. समुद्री चाचे त्यांच्यावर कधी आक्रमण करतील, याचा नेम नव्हता. भारतीय नौसेनेमुळे त्यांना एक आधार मिळाला आहे. इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यावर काही मासांनी अमेरिका आणि मित्र राष्ट्रे यांनी समुद्रात कार्यरत हुती बंडखोरांच्या नौकांवर बाँबवर्षाव केला. ‘आमच्या परिसरातील व्यापारी नौकांना लक्ष्य करू’, अशी धमकी हुती बंडखोरांनी दिली होती. त्यामुळे अमेरिका आणि तिची काही मित्र राष्ट्रे यांनी संयुक्तपणे हवाई आक्रमणे केली. भारतीय नौदल एक हाती आणि अचूक कारवाई करत समुद्री चोरांना वठणीवर आणत आहे. भारतीय नौदलामुळे समुद्री चोरांची आक्रमणे निष्प्रभ होत आहेत. त्यामुळे आव्हानात्मक अशा या नौदलाच्या क्षेत्रात युवकांनी सहभागी होऊन देशसेवा करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. या संधीचाही युवकांनी लाभ घ्यावा अन् भारतीय नौदलाने छत्रपती शिवरायांच्या आरमाराप्रमाणे असाच धाक कायम राखावा, ही सदिच्छा !

वेगवान, अचूक आणि आक्रमक कारवाया करून समुद्री चोरांचे कंबरडे मोडणारे भारतीय नौदल देशासमोर आदर्श !