जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांचा आदेश !
रत्नागिरी – निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादींचा संबंधित जागा मालकाच्या अनुमतीविना आणि संबंधित परवाना देणार्या प्राधिकरणाच्या अनुमतीविना वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (६ जून २०२४ पर्यंत) निर्बंध घालत आहोत, असा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिला.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी १६ मार्च या दिवशी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहितेची कार्यवाही चालू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणार्या उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादींकरता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची अनुमतीविना आणि संबंधित परवाना प्राधिकरणाच्या अनुमतीविना वापर करण्यास निर्बंध घातल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना असलेल्या अधिकार्यांचा वापर करून लागू केले आहेत.
प्रत्येक इसमावर हा आदेश लागू करणे शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने घोषित करून त्यास प्रसिद्धी द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.