गोव्यात ११ लाख ७२ सहस्र मतदार
पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केल्यानंतर गोव्यात राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी आर्. वर्मा यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत घेऊन गोव्यातील निवडणुकीच्या सिद्धतेविषयी माहिती दिली.
मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा म्हणाले, ‘‘गोव्यातील मतदारसूचीत ११ लाख ७२ सहस्र ८७७ मतदारांची नोंद आहे आणि यामधील ११ सहस्र ६४० मतदार हे ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील आहेत. लोकसभेची निवडणूक निष्पक्ष होण्यासाठी ३८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार आल्यावर पुढील ३० मिनिटांच्या आत तक्रारीची नोंद घेतली जाणार आहे. गोव्यात ‘सी.आर्.पी.एफ्.’च्या (केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या) २ तुकड्या आहेत. अशा आणखी १४ तुकड्या मागवल्या आहेत.’’
गोव्यात आता १०३ अतिरिक्त मतदार केंद्रे
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पुढे म्हणाले, ‘‘लोकसभेच्या मागील निवडणुकीत गोव्यात १ सहस्र ६२२ मतदार केंद्रे होती. यंदाच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात ८६३, तर दक्षिण गोव्यात ८६२ अशी एकूण १ सहस्र ७२५ मतदान केंद्रे असणार आहेत.’’ राज्यात २१८ ‘मॉडेल’ मतदान केंद्रे असतील. यामध्ये पर्यावरणपूरक, तसेच महिला, विकलांग, युवावर्ग यांच्याकडे दायित्व असलेली मतदान केंद्रे यांचा समावेश आहे.
‘इ.एस्.एम्.एस्.’ ॲपचा वापर करून थेट संबंधित ठिकाणावरून कह्यात घेतलेल्या साहित्याची नोंद करणार
गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालय आचारसंहिता लागू असतांना ‘इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टम’ (इ.एस्.एम्.एस्.) या ॲपचा वापर करून कह्यात घेतलेल्या साहित्याच्या (रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू, अन्य वस्तू) थेट कह्यात घेतलेल्या ठिकाणावरून नोंदी करू शकणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्ती यांच्यासाठी घरबसल्या मतदानाची सोय
ज्येष्ठ नागरिक (८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ११ सहस्र ६४० मतदार) आणि विकलांग व्यक्ती (एकूण ९ सहस्र ३७२ मतदार) यांच्यासाठी घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यात १२ तृतीयपंथी मतदार आहेत.
७ सहस्र पोलीस, १४ सशस्र तुकड्या आणि ३८ भरारी पथके यांच्या माध्यमातून देखरेख ठेवणार
निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ७ सहस्र पोलीस आणि १४ सशस्र तुकड्या (सी.आर्.पी.एफ्.च्या तुकड्या) नेमण्यात येणार आहे. ‘सी.आर्.पी.एफ्.’च्या तुकड्या सध्या गोव्यात आहेत. उत्तर गोव्यात ७ आणि दक्षिण गोव्यात ८ मिळून असे एकूण १५ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.