समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रचाराचे कार्य करतांना अनिष्ट शक्तींच्या होणार्‍या आक्रमणांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले रक्षण !

‘आताच्या काळात व्यष्टी साधनेला (नामजप इत्यादी वैयक्तिक साधनेला) ३५ टक्के महत्त्व आहे, तर समष्टी साधनेला (धर्मप्रचार, धर्मरक्षण इत्यादी) ६५ टक्के महत्त्व आहे. शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणे आवश्यक असते. समष्टी साधना, म्हणजे ‘समाजात जाऊन साधनेचा प्रचार करणे किंवा धर्मप्रचार करणे’, असे असल्यामुळे या कार्याला वाईट शक्तींचा नेहमीच विरोध असतो. हा विरोध सूक्ष्म स्तरावरील असल्यामुळे तो लगेच लक्षात येत नाही. समष्टी साधना करणार्‍या साधकाची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असेलच, असे नाही; परंतु गुरु सर्वज्ञ असल्यामुळे अशा सूक्ष्म स्तरावरील आक्रमणांपासून ते साधकांचे रक्षण करतात. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून माझे कसे रक्षण केले’, ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. (भाग १०)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांशी त्यांचा त्रास न्यून होईपर्यंत बोलणे

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

वर्ष २०११ मध्ये मी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर होतो. या दौर्‍याच्या कालावधीत काही तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे साधक मला भ्रमणभाष करत असत. तेव्हा त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रास पुष्कळ वाढलेला असे. त्या स्थितीतच ते माझ्याशी बोलायचे. माझ्याशी बोलल्यावर त्यांना बरे वाटायचे; म्हणून मी त्यांच्याशी बोलत रहायचो. हे बोलणे ५ – १० मिनिटेही चालायचे. साधकांचा त्रास वाढलेला असल्यामुळे मी त्यांना ‘वाईट शक्ती त्रास का देते ?’, याविषयी सांगायचो. तेव्हा ते मला सांगायचे, ‘‘आम्हाला प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील चैतन्य सहन होत नाही.’’ मी त्यांना सांगायचो, ‘‘तुम्ही गुरुदेवांना प्रार्थना करून नामजप करा. त्यानेच तुमचा त्रास न्यून होईल.’’ त्या साधकांशी असे बोलण्यात आणि त्यांचे बोलणे ऐकण्यात माझा वेळ जायचा; परंतु ‘त्या साधकांना बरे वाटावे’, यासाठी मी त्यांच्याकडून काही प्रार्थना अन् नामजप करून घ्यायचो आणि त्यांचा त्रास न्यून होईपर्यंत त्यांच्याशी बोलत रहायचो.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांनी आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी पू. राजेंद्र शिंदे यांना विचारू नये, स्थानिक स्तरावर विचारावे’, अशा आशयाची चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करणे, त्यानंतर त्रास असलेल्या साधकांचे भ्रमणभाष न येणे

त्यानंतर एक दिवस सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी त्यांचे आध्यात्मिक त्रास सांगण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांना भ्रमणभाष करू नये. त्याविषयी काही विचारायचे असल्यास स्थानिक स्तरावर विचारावे’, अशा आशयाची चौकट छापली. त्यांनी अकस्मात् ‘अशी चौकट का छापली ?’, याविषयी मलाही काही कळले नाही; पण त्यानंतर त्रास असणार्‍या साधकांचे मला येणारे सर्व भ्रमणभाष बंद झाले.

३. ‘माझा साधनेतील वेळ वाया जाऊन आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी असे नियोजन केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात येणे

प्रत्यक्षात ‘माझा समष्टी साधनेतील, म्हणजे प्रचारातील वेळ वाया जावा’, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या माध्यमातून मला भ्रमणभाष करून माझा वेळ वाया घालवत होत्या आणि त्या माध्यमातून माझ्यावर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे प्रक्षेपण करून मला त्रास देत होत्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच हे माझ्या लक्षात आले.

४. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे साधकाची साधना आणि कार्य दोन्हींचीही हानी होऊ शकणे

चांगली साधना करणारा साधकच श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली धर्मप्रचाराचे कार्य करू शकतो. नाही तर वाईट शक्तींच्या आक्रमणांमध्ये फसून त्याची साधना आणि कार्य या दोन्हींचीही हानी होऊ शकते; म्हणून धर्मप्रचाराचे कार्य करतांना ‘सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे आवश्यक आहे’, हे त्यावरून माझ्या लक्षात आले.

५. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार धर्मप्रचाराचे कार्य करणे आवश्यक असणे

यातून धर्मप्रचाराचे कार्य करणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार धर्मप्रचाराचे कार्य करण्याचे महत्त्व लक्षात येते.

६. कृतज्ञता

‘साक्षात् श्रीविष्णूचा अंशावतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच सूक्ष्मातील हा भाग ओळखू शकले आणि त्यांनी वेळीच मला या त्रासांपासून वाचवून माझा साधनेतील वेळही वाचवला’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण ! (क्रमशः पुढच्या रविवारी)

इदं न मम ।’ (हे लिखाण माझे नाही !) – (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१०.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक