शठं प्रति शाठयम् !

१. गोव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा वटहुकूम काढणार्‍या ‘गव्हर्नर’ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची धडावेगळी केलेली शिरे भेट म्हणून पाठवल्यावर त्याने वटहुकूम मागे घेणे

‘गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज गेले असतांना त्यांना समजले की, तेथील ‘गव्हर्नर’ने ‘गोव्यात ज्यांना रहायचे असेल, त्यांनी ख्रिस्ती झाले पाहिजे. हिंदूंना ‘इस्टेट’ (मालमत्ता) करता येणार नाही’, असा वटहुकूम काढलेला आहे. त्यामुळे एक मासात ३०० कुटुंबांना ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा लागला. त्यांना ४ धर्मगुरूंनी बाप्तिस्मा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी या ४ धर्मगुरूंना धरून (पकडून) आणले. त्यांना आज्ञा करण्यात आली (फर्मावण्यात आले), ‘तुम्ही ताबडतोब हिंदु धर्म स्वीकारा, नाही तर मरणास सिद्ध व्हा.’ धर्मगुरूंनी हिंदु धर्म स्वीकारण्यास नकार दिला. त्या धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्याची आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्यांची शिरे पोर्तुगिज गव्हर्नरला भेट म्हणून पाठवण्यात आली. ही आगळी वेगळी भेट पाहून पोर्तुगीज गव्हर्नर घाबरला. त्याने काढलेला वटहुकूम मागे घेतला.

सुरतेच्या चढाईत छत्रपती शिवरायांनी चर्चला संरक्षण दिले होते. तेथील चर्चप्रमुखाने सांगितले, ‘तुमचे भांडण मोगलांशी आहे. तेव्हा आम्हाला त्रास देऊ नका.’ छत्रपती शिवरायांनी ते ऐकले. ‘पाद्री लोक धर्मांतर घडवून आणतात, लोकांना बाप्तिस्मा देतात’, हे महाराजांना समजले. तेव्हा त्या पाद्र्यांना महाराजांनी अशा प्रकारे धडा शिकवला. समर्थांच्या राजकारणाचे ‘जशास तसे’ हे वैशिष्ट्य होते.

२. औरंगजेबाच्या आदेशाने शंकराचे मंदिर पाडून बांधलेल्या मशिदीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराची पुनर्स्थापना करणे

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत स्वारीवर गेले. तेव्हा त्यांनी तिरुवण्णामलाई जिंकून घेतले. पूर्वी औरंगजेबाने तिरुवण्णामलाई जिंकले, त्या वेळी तेथे असलेले शंकराचे मंदिर पाडून मशीद उभारली होती. छत्रपती शिवरायांनी तिरुवण्णामलाई जिंकल्यानंतर मौलवीकडे चौकशी केली आणि ८ दिवसांच्या आत परत पूर्वीसारखे शंकराचे मंदिर उभे करून देण्यास सांगितले. अशा प्रकारे ८ – १० ठिकाणी मशिदी पाडून उद्ध्वस्त मंदिरांची पुनर्स्थापना छत्रपती शिवरायांनी केलेली दिसून येते.’

(साभार : श्री समर्थ रामदासस्वामींची राष्ट्र-धर्म आणि शिकवण)