Global Spirituality Mahotsav : मनो-आध्‍यात्‍मिक उपचारांद्वारे स्‍वास्‍थ्‍य प्राप्‍ती शक्‍य ! – चेतन राजहंस, सनातन संस्‍था

  • भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्‍यात्‍म महोत्‍सव’ !

  • आचार, विचार, आहार आणि दिनचर्या यांचे करता येते संतुलन !

व्‍यासपिठावर डावीकडून डॉ. आर्.एस्. भोगाल, डॉ. जीना, श्री. चेतन राजहंस आणि इसाबेला वाश्‍चमुथ

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – स्‍वास्‍थ्‍यप्राप्‍तीसाठी आचार, विचार, आहार आणि दिनचर्या यांना संतुलित करणे आवश्‍यक असते; परंतु प्रयत्न करूनही व्‍यक्‍तीमत्त्वातील दोषांमुळे आचार, विचार, आहार अन् दिनचर्या यांचे आदर्शरित्‍या पालन करता येत नाही. आळस या दोषामुळे व्‍यक्‍ती अधिक झोपते, खादाडपणा असणारी व्‍यक्‍ती आहार नियंत्रित करू शकत नाही, निरर्थक विचार केल्‍याने मनाची ८० टक्‍के ऊर्जा वाया जाते. या स्‍वभावदोषांवर ‘मनो-आध्‍यात्मिक उपचार’ (सायकोस्‍पिरिच्‍युअल थेरपी) करून मात करता येते. सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘स्‍वयंसूचना उपचार पद्धती’ विकसित केली. यांतर्गत बुद्धीने मनाला आध्‍यात्‍मिक दृष्‍टीकोन देऊन योग्‍य कृती करण्‍यासाठी समजावले जाते, अशी महत्त्वपूर्ण माहिती सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली. येथे चालू असलेल्‍या ‘जागतिक अध्‍यात्‍म महोत्‍सवा’त १६ मार्च या दिवशी ‘आध्‍यात्मिक साधनेचा स्‍वास्‍थ्‍यावर होणारा परिणाम’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. ‘दैनंदिन जीवनात दिनचर्या संतुलित करण्‍यात अध्‍यात्‍माचे काय महत्त्व आहे ?’, या प्रश्‍नावर त्‍यांनी वरील उत्तर दिले.

श्री. राजहंस पुढे म्‍हणाले की, स्‍वयंसूचना पद्धतीमुळे बर्‍याच लोकांना दिनचर्या नियंत्रित करण्‍यात यश आले आहे. ‘जीवनातील अनेक समस्‍यांमागे ८० टक्‍के आध्‍यात्‍मिक कारणे असतात’, हे  सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना लक्षात आल्‍यानंतर त्‍यावर त्‍यांनी विविध आध्‍यतिक साधनापद्धती सांगितल्‍या. एका विदेशी साधकाला ‘एक्‍झिमा’ हा त्‍वचारोग झाला होता. त्‍याने पुष्‍कळ औषधोपचार करूनही त्‍याचा आजार बरा होत नव्‍हता. या आजारामागे पूर्वजांचा त्रास हे कारण असल्‍याचे लक्षात आल्‍यावर साधकाने दत्तगुरुंचा जप चालू केला. त्‍यामुळे त्‍याचा हा आजार बरा झाला.

श्री. राजहंस यांनी मांडलेल्‍या सूत्रांविषयी अनेकांनी परिसंवादानंतर कुतुहलाने अधिक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘हार्टफुलनेस’ संस्‍थेच्‍या डॉ. स्नेहल देशपांडे यांनी केले.

पुणे येथील ‘केवल्‍यधाम’ संस्‍थेचे डॉ. आर्.एस्. भोगाल यांनी ‘मंत्रयोगांच्‍या चढउतारांमुळे शरिरावर कसा परिणाम होतो ?’, या विषयावर मार्गदर्शन केले. ‘ब्रह्मकुमारीज’ संप्रदायाच्‍या अमेरिकेत वास्‍तव्‍यास असणार्‍या डॉ. जीना यांनी त्‍या आजारी असतांना अध्‍यात्‍माकडे कशा वळल्‍या ?, याविषयी माहिती सांगून ‘आध्‍यात्‍मिक साधनेमुळे आरोग्‍य कसे सुधारले ?’ याविषयीही सविस्‍तर माहिती दिली. ‘जागतिक आरोग्‍य संघटने’च्‍या इसाबेला वाश्‍चमुथ यांनी ‘कलेच्‍या सादरीकरणातून स्‍वास्‍थ्‍यावर कशा प्रकारे सकारात्‍मक परिणाम होतो ?’ याची माहिती उपस्‍थितांना दिली.

स्‍वास्‍थ्‍यपूर्ण जीवनासाठी साधना करणे आवश्‍यक ! – चेतन राजहंस

या वेळी श्री. चेतन राजहंस म्‍हणाले की, जागतिक आरोग्‍य संघटनेने स्‍वास्‍थ्‍याविषयी केलेली व्‍याख्‍या सांगते की, ‘स्‍वास्‍थ्‍य म्‍हणजे आजार नसलेली स्‍थिती नाही, तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील सकारात्‍मक स्‍थिती म्‍हणजे स्‍वास्‍थ्‍य !’ आयुर्वेदानुसारही आत्‍मा, मन आणि इंद्रिये प्रसन्‍न असण्‍याला स्‍वास्‍थ्‍य समजले जाते. या दृष्‍टीकोनातून पाहिले, तर स्‍वास्‍थ्‍यपूर्ण जीवनासाठी आरोग्‍य पुरेसे नसून सकारात्‍मक स्‍थितीला महत्त्व आहे. आधुनिक चिकित्‍सा पद्धतींच्‍या माध्‍यमातून शारीरिक आणि मानसिक उपचार करता येतात; पण आत्मिक उपायांसाठी आध्‍यात्मिक साधना करणे आवश्‍यक असते. ही साधना कोणत्‍याही योगमार्गाने करता येऊ शकते. त्‍यातूनच सकारात्‍मकता निर्माण होऊ शकते.