Goa Drugs Racket : गोवा – ‘अपना घर’मधील मुलाने धमकी दिल्याची महिला अधिवक्त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार !

पणजी, १४ मार्च (वार्ता.) : ‘अपना घर’मधील मुलाने ‘गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिल्याची तक्रार संबंधित मुलाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अधिवक्त्या वाहिंदा यलगार यांनी जुने गोवे पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. गोवा शासनाच्या ‘अपना घर’मधील अल्पवयीन मुलांना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी अधिवक्त्या वाहिंदा यलगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला अधिवक्त्यांना धमकी देणार्‍या मुलाच्या विरोधात यापूर्वीच फौजदारी स्वरूपाचे ३ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये एक गुन्हा हत्येचा प्रयत्न केल्यासंबंधी आहे. संबंधित मुलाला कह्यात घेण्यास त्याच्या आईचीही सिद्धता नाही.

अधिवक्त्या वाहिंदा यलगार यांनी सुनावणी घेतांना ‘अल्पवयीन न्याय मंडळा’ला सांगितले की, मुलाची आई आणि संबंधित मुलाची सुरक्षा धोक्यात आहे. संबंधित मुलगा हिंसक बनतो आणि ‘गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी देतो. या प्रकरणी पोलिसांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे.’’ अधिवक्त्या यलगार यांनी पोलीस तक्रारीत संबंधित मुलाने त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. हा मुलगा ‘अपना घर’मधील प्रतिबंधित भागातही उघडपणे फिरत असतो आणि व्यवस्थापनाचा त्याच्यावर कोणताच अंकुश नसल्याच्या तक्रारी आहेत. जुने गोवे पोलिसांच्या मते, पोलीस या प्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदवून आवश्यक कारवाई करणार आहे. गोवा सरकारच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे अमली पदार्थ आढळल्याच्या तक्रारी आहेत, तसेच ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी या प्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे.

संपादकीय भूमिका

‘अपना घर’मध्ये मुलांचे पुनर्वसन होत नसल्याचे हे दर्शक ! हे प्रशासनाला लज्जास्पद !