विनय केळकर आणि किरण कांबळे हे दोन खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील अंतिम युक्तीवाद

पुणे, १३ मार्च (वार्ता.) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदार विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांनी ओळखले आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे. वस्तूत: कांबळे हे नियम १६४ (न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिलेला जबाब) च्या जबाबात वेगळे सांगतात, नियम १६१ च्या जबाबात वेगळे सांगतात आणि प्रत्यक्ष न्यायालयात वेगळेच सांगतात. हत्येनंतर त्यांची साक्ष तब्बल ९ वर्षांनी नोंदवण्यात आली. दोघा संशयितांची छायाचित्रे कांबळे यांनी अगोदरच पाहिली होती, त्यामुळे त्यांनी संशयितांना ओळखले, यात अर्थ रहात नाही. कांबळे एकदा ‘१०-१५ सेकंदात गोळ्या झाडल्या’, असे सांगतात, तर अन्य वेळी ‘२ मिनिटांत गोळ्या झाडल्या’, असे सांगतात. याचसमवेत दुसरा साक्षीदार विनय केळकर कलम १६४ च्या जबाबात ‘संशयितांनी पांढरा शर्ट आणि जर्कीन घातले’, असे सांगतात, तर प्रत्यक्ष साक्षीत ‘जर्कीन’ घातले होते’, असे सांगतात. कलम १६४ च्या जबाबात विनय केळकर यांनी ‘सचिन अंदुरे हे तिथे नसल्याचे सांगितले होते’, असे सांगतात. विनय केळकर यांनी ‘दोघा संशयितांना वरच्या मजल्यावरून पाहिले आणि त्या दोघांनी टोपी घातली होते’, असे ते सांगतात. टोपी घातलेल्या व्यक्तीचे चेहरे साक्षीदार कसे काय ओळखू शकतील ? त्यामुळे विनय केळकर आणि किरण कांबळे यांच्या साक्षीत प्रचंड विसंगती असल्याने त्यांची साक्ष ग्राह्य धरता येणार नाहीत, तसेच हे दोघे खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले आहेत, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील युक्तीवाद २६ आणि २७ मार्चला होणार आहे.

ज्यांच्यावर मुख्य संशय त्यांना सूट, केवळ सनातन संस्थेला ‘लक्ष्य’ करत अन्वेषण ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सप्टेंबर २०१६ मध्ये सीबीआयने प्रविष्ट केलेल्या पहिल्या आरोपपत्रात ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्या’, असे सांगण्यात आले. या दोघांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी ओळखले होते. यानंतर वर्ष २०१८ मध्ये प्रविष्ट केलेल्या दुसर्‍या आरोपपत्रात ‘सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केली’, असे सांगण्यात आले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पहिल्यांदा शस्त्र तस्कर असलेले विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांनी हत्येच्या प्रकरणी बंदूक पुरवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. काही वर्षांनंतर दोघांच्या विरोधात पुरावा नसल्याचा अहवाल अन्वेषण यंत्रणांकडून न्यायालयात सादर करण्यात आला. ज्यांच्याकडे बंदूक मिळून आली आणि ज्यांच्यावर प्राथमिकदृष्ट्या संशय व्यक्त करण्यास मोठ्या प्रमाणात जागा आहे, त्यांना सोडून देण्यात आले अन् ज्या सनातन संस्थेच्या विरोधात कोणताच थेट पुरावा नाही, त्यांना मात्र जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करून सीबीआयने खोटा खटला उभा केला.

अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी मांडलेली प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीतील फोलपणा दर्शवणारी सूत्रे

१. त्या दिवशी प्रथमदर्शी अहवाल देणारे पोलीस अधिकारी नवनाथ रानगट यांनी ‘साक्षीदार विनय केळकर यांना मी ओळखतो. मी त्यांच्या घरी गेलो आहे’, असे सांगितले, तर साक्षीदार विनय केळकर म्हणतात, ‘मी रानगट’ यांना ओळखत नाही.’

२. साक्षीदार किरण कांबळे यांनी न्यायालयात जेव्हा साक्ष नोंदवली त्या कालावधीत ते अंनिसच्या कार्यकर्त्यांसमवेत असत, त्यांच्यासवेत भोजन करत.

३. साक्षीदार विनय केळकर यांनी ‘मी हत्या झाली, तेव्हा काही वेळानंतर त्या जागेवर एका महिला पोलीस अधिकार्‍याला तेथे पाहिले होते’, असे सांगितले. या महिला पोलीस अधिकार्‍याची साक्ष नोंदवण्यात आली नाही.

४. साक्षीदार किरण कांबळे हे प्रत्यक्ष घटनेच्या प्रसंगी तेथे उपस्थित नव्हते, तर सीबीआयने त्यांना दबावाखाली आणून सिद्ध केलेले ते खोटे साक्षीदार आहेत. कांबळे हे त्यांच्या साक्षीत ‘मी गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले’, असे सांगतात, तसेच त्यांनी दोघा संशयितांनी गोळ्या झाडतांना पाहिले’, असा कुठेही जबाब नाही.


अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या युक्तीवादातील अन्य काही सूत्रे

१. ‘हत्या झाल्याच्या आदल्या दिवशी डॉ. दाभोलकर अमेय अपार्टमेंटमध्ये होते’, असा कुठलाच पुरावा सरकारी पक्षाकडे नाही.

२. हत्येच्या दिवशी पुलावर उपस्थित असणारे पोलीस अधिकारी नवनाथ रानगट यांनी ‘त्या दिवशी नाकाबंदी नव्हती, तसेच ‘मी गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला नाही’, असे सांगतात, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ‘गोळ्यांचे आवाज आले’, असे सांगतात.

३. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ‘संशयितांनी मागून येऊन डॉ. दाभोलकर यांना गोळ्या झाडल्या’, असे सांगितले; प्रत्यक्षात पडताळणीसाठी आणलेल्या श्वान पथकातील कुत्र्याने संशयित बालगंधर्वाच्या दिशेने, म्हणजे विरुद्ध दिशेने गेल्याचा मार्ग दाखवला.

अंनिसच्या प्रशांत पोतदार याने वैफल्यग्रस्त होऊन सनातन संस्थेवर आरोप केले का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अंनिसने स्थापनेनंतर ९ वर्षांचे आर्थिक ताळेबंद सादर केले नाहीत. डॉ. दाभोलकर यांच्या संस्थेच्या अधिकोष खात्यात परदेशातून निधी येत होता. अंनिसच्या अनेक आर्थिक व्यवहारांविषयीच्या खोटेपणाविषयी सातारा येथील धर्मादाय आयुक्तांकडे अनेक दावे चालू आहेत. याचसमवेत सातारा येथील कार्यालयात काम करणारा कर्मचारी प्रशांत पोतदार याने अंनिसच्या कामासाठी न्यासाकडून गाडी घेतली; मात्र त्याची कुठेही नोंद नव्हती. त्यामुळे अंनिसचा कार्यकर्ता प्रशांत पोतदार याने वैफल्यग्रस्त होऊन सनातन संस्थेवर आरोप केले का ? हे पडताळून पहायला हवे, असेही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.