इराणला सुदानमध्ये स्वतःच्या नौदलाचा तळ उभारायचा आहे; परंतु सुदानने नकार दिला आहे. प्रश्न असा आहे की, इराणला सुदानमध्ये नौदलाचा तळ का हवा आहे ? आणि सुदान का नकार देत आहे ? सुदान हा आफ्रिकेच्या ईशान्य भागात असून इजिप्तच्या दक्षिणेला आहे. सुदानचा बराच भाग, म्हणजे जवळजवळ ७५० किलोमीटरचा पट्टा लाल समुद्राच्या किनार्यावर आहे. त्यामुळे इराणला लाल समुद्रावर स्वतःचा नौदलाचा तळ हवा आहे.
१. इराणला लाल समुद्रात नौदलाचा तळ का हवा ? यामागील कारणे
याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे इराणचे शेजारी देश सौदी अरेबिया आणि इजिप्त यांना लाल समुद्र जवळ आहे. त्यामुळे ते त्याचा वापर करू शकतात; परंतु इराण करू शकत नाही. दुसरे कारण म्हणजे समुद्री व्यापाराचा आपल्यासाठी हत्यार म्हणून वापर करणे. सध्या हुती हे काम करत आहेत. ते लाल समुद्रातून जाणार्या व्यापारी नौकांवर आक्रमण करत आहेत. या हुती आतंकवाद्यांना इराणच्या शासनकर्त्यांचा पाठिंबा आहे; कारण इराणला ठाऊक आहे की, हा मार्ग महत्त्वाचा असून याद्वारे जागतिक सत्तांमध्ये ते भीती निर्माण करू शकतात. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना वचक बसवणे, हुतींना सहकार्य करणे आणि पाश्चात्त्य सत्तांवर अंकुश ठेवणे यांसाठी इराणला नौदलाचा तळ हवा आहे.
२. सुदानने इराणला नौदल तळ उभारण्यास नकार देण्यामागील कारण
असे असले, तरी सुदान नकार का देत आहे ? इराणने सुदानला नौदलाच्या तळाच्या बदल्यात ‘हेलिकॉप्टर कॅरियर’ देऊ केले होते; परंतु सुदानला पाश्चात्त्य राष्ट्रांची भीती वाटली. वर्ष २०१९ पर्यंत सुदानवर ओमर अल बशीर या हुकूमशाहचे राज्य होते; परंतु नंतर तिथे लष्कराने उठाव केला. सैन्याच्या अधिकार्यांनी सत्ता हाती घेतली आणि त्यांनी इराणला दूर ठेवले; कारण त्यांना पश्चिमेकडील संबंध सुधारायचे होते. वर्ष २०२१ मध्ये सुदानने इस्रायलला मान्यता दिली आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेकडून सवलत मिळाली आहे. आतंकवादी कारवाया करणार्यांच्या सूचीतून सुदानचे नाव वगळले गेले आणि त्याखेरीज सुदानला १.२ अब्ज डॉलरचे (८३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) कर्ज देण्यात आले. त्यामुळे पश्चिमी राष्ट्रांच्या बाजूने राहिल्याने सुदानला अधिक लाभ होता. हे एक साधे डावपेचाचे सूत्र होते; परंतु भविष्यात कदाचित् हे चित्र पालटू शकते; कारण सुदानचा भाग सध्या संकटात आहे. तिथे लष्कर आणि जलद साहाय्य करणारे पोलीस (त्या देशातील मुख्य निमलष्करी दल) यांच्यामध्ये नागरी युद्ध चालू झाले आहे. या उठावाला तोंड देण्यासाठी लष्कराला शस्त्रास्त्रे हवी आहेत. त्यासाठी सुदानला पाठिंब्याची आवश्यकता आहे. हे समीकरण काही स्थिर नव्हे.
३. हुतींनी समुद्राखालील इंटरनेटची केबल तोडल्याची शक्यता आणि त्यांचे नवीन नियोजन
इराण अजूनही लाल समुद्रात तळ उभारण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गोंधळात अजून भर पडेल. फेब्रुवारी मासात हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात एका ब्रिटीश नौकेवर आक्रमण करून ती पाण्यात बुडवली. याखेरीज लाल समुद्रात पाण्याखाली असलेल्या महत्त्वाच्या ३ ‘ऑप्टीकल केबल्स’ कुणीतरी कापल्या आहेत आणि ही गंभीर गोष्ट आहे; कारण पाण्याखाली असलेल्या या केबल्स इंटरनेटसाठी जीवदायिनी, म्हणजेच इंटरनेटसाठी या केबल्सचा उपयोग होतो. यामुळे इराण आणि सुदान या २ देशांमध्ये माहितीची देवाण-घेवाण होते. जर या केबल्स कापल्या, तर इंटरनेटद्वारे होणारी कामे ठप्प होतील आणि प्रत्यक्षातही तेच झाले आहे. आशिया आणि युरोप येथे २५ टक्के संपर्क बंद झाला आहे. आस्थापने ‘याला पर्याय कोणता ?’, असे विचारत आहेत; परंतु या केबल्स कुणी कापल्या ? हे मात्र ठाऊक नाही. मुख्य संशय हुतींवर आहे; कारण त्यांनी ‘एम्.एस्.सी. स्काय’ या नौकेवर क्षेपणास्त्रे सोडून आक्रमण केले. या वेळी भारतीय नौदलाची ‘आय.एन्.एस्. कोलकोता’ ही नौका तिथे पोचली आणि त्यांनी आग विझवली. यामध्ये भारताच्या १२ सैनिकांनी सहभाग घेतला.
आता ‘नौकांनी लाल समुद्रातून जातांना काही पैसे देऊन त्यांची अनुमती घ्यावी’, असे हुतींना वाटते. हा चुकीचा पायंडा आहे. प्रारंभीला हुतींनी म्हटले, ‘इस्रायलने गाझामधील युद्ध थांबवावे; म्हणून आम्ही आक्रमण करतो.’ आता युद्ध थांबल्यावर हुतींनी स्वतःचे नियोजन पालटले आहे. या धोरणांमुळे त्यांच्याकडे पुष्कळ लक्ष दिले जात आहे, तसेच त्यांना पैसेही मिळत आहेत. हुती जर असेच करत राहिले, तर जागतिक सत्तांसाठी ती एक नवीन डोकेदुखी ठरेल.
– पल्की शर्मा उपाध्याय
(साभार : ‘फर्स्ट पोस्ट’चे संकेतस्थळ)