Amethi Railway Stations Renamed : अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

जैस रेल्वे स्थानकाचे गुरु गोरखनाथ धाम असे नामांतर

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७ रेल्वे स्थानकांना जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरे आणि महापुरुष यांची नावे देण्यात येणार आहेत. याविषयी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे पत्र केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विशेष सचिवांना पाठवले आहे.

१. अलीकडेच जिल्ह्यातील लोकांनी रेल्वे स्थानकांची नावे पालटण्याची मागणी केली होती. ही गोष्ट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता.

२. या प्रस्तावावर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव ललित कपूर यांच्या वतीने राज्य सरकारच्या विशेष सचिवांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे.

३. जिल्ह्यातील कासिमपूर हॉल्टला जैस सिटी, जैस रेल्वे स्थानकाला गुरु गोरखनाथ धाम, बानी रेल्वे स्थानकाला स्वामी परमहंस, मिश्रौली रेल्वे स्थानकाला माँ कालिकन धाम, फुरसातगंज स्थानकाला बाबा तपेश्‍वर धाम, असे नाव देण्यात येणार आहे. निहालगढ रेल्वे स्थानकाचे नाव महाराजा बिजली पासी, अकबरगंज रेल्वे स्थानकाचे नाव मां अहोर्व भवानी धाम, वारिसगंज स्थानकाचे नाव अमर शहीद भले सुलतान असे करण्यात येणार आहे.