प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश !
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, उपयोग, वितरण, विक्री आणि साठवणूक यांवर वर्ष २०१८ अधिनियमाद्वारे बंदी घालण्यात येऊनही त्याचा उपयोग पुन्हा चालू झाला आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरणार्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी आणि या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पूत्र सिद्धेश कदम यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष पदाचे दायित्व स्वीकारले आहे. हे दायित्व स्वीकारल्यानंतर एकल वापर प्लास्टिकवरील बंदीसाठी त्यांनी तत्परतेने कारवाईचे निर्देश दिले आहेत.