छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान कालातीत ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘लोककल्याणकारी शिवरायआणि त्यांची राजनीती’ या विषयावर विशेष व्याख्यान


रत्नागिरी – सखोल अभ्यास, चिंतन, त्या आधारे आखलेली नीती आणि त्यानुसार केलेली कृती हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक असून, त्यांचे तत्त्वज्ञान कालातीत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांनी येथे केले.

शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. पांडुरंग बलकवडे यांचे ‘लोककल्याणकारी शिवरायआणि त्यांची राजनीती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध विभागांच्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. बलकवडे पुढे म्हणाले की,

१. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय आणि अत्याचार यांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्य स्थापनेची पार्श्वभूमी विशद करून छत्रपती शिवरायांच्या राजनीतीविषयक कार्याचा पाया घालण्याचे कार्य त्यांचे वडील शहाजी राजे यांनी केले.

२. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्याच्या भूमीत जिजाबाईंनी शिवरायांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून ती भूमी पवित्र केली, ही जगातील एकमेव घटना आहे.

३. नीतीविषयक प्राचीन भारतीय ग्रंथ, शस्त्रविद्या, दुर्गशास्त्र, न्यायविद्या इ.ची शिकवण देऊन त्यांनी एक आदर्श राजा घडवला. शहाजीराजांच्या राज्याचे स्वराज्यात रूपांतर केले.

४. कृषिक्रांती, अर्थक्रांती, सामाजिक क्रांती, राष्ट्रक्रांती, लष्करक्रांती आणि त्यातून घडून आलेली सांस्कृतिक क्रांतीद्वारे स्वराज्याचा पाया घालून एक आदर्श राज्य त्यांनी निर्माण केले.

५. भावी पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आदर्श समाज निर्माण करावा.

या वेळी मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, ‘‘एक आदर्श राजा आणि प्रजा कशी असावी ? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य होय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य या विषयाचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना लाभ होईल.’’