प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही. मृत्यूनंतर हे कुणी साथ द्यायचे नाहीत. सगळे इथेच राहील. सगळे इथेच रहाणार आहे. ज्यांनी साम्राज्ये आणि सिद्धी मिळवल्या, विजेते झाले, तरी असे अनंत लोक इतिहासाच्या रस्त्याला दुतर्फा पडलेले आहेत. असंख्य जणांच्या नावांची निशाणीही नाही. काही नावे असली, तरी तीही काळाच्या ओघात नष्ट होणार आहेत. मृत्यूनंतर समवेत काहीच येणार नाही, तर व्यर्थ सायास (प्रयत्न) तरी कशाला ? त्याकरता विनाकारण श्रम तरी का करा ?
मृत्यूचे सोडा; पण आजवर जे केले, त्यात काय पदरी पडले ? कोणते समाधान लाभले ? मागे वळून पाहिले, तर सगळे शून्य दिसेल ! अनंत जन्म झाले, अनंत कर्मे झाली. कर्माकरताच जन्म घेतले. सतत कर्म ! कर्म ! क्षणभर विश्रांती नाही. ‘या कर्मचक्रातून मुक्तता करायची असते’, ही धारणा बळावली की, वासनेचा त्याग घडतो. कर्म करायची इच्छाच होत नाही. अंतर्मुख बनला, अंतरीच्या भगवंताची थोडीशी चुणूक गवसली की, मग बाहेर यायची इच्छा रहात नाही.
शुद्ध विश्रांतीच्या, त्या अंतरीच्या स्थळीच तो विसावतो आणि सुखावतो. तो विश्रांती करताच धडपडतो, हाच कर्मसंन्यास !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२३)