पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोल्हापूर – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी ७५० कोटी रुपये देण्यात येतील. त्यातून आवश्यक त्या ठिकाणी गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे महिला सशक्तीकरण अभियानाच्या प्रसंगी बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शहरांतर्गत फिरणार्‍या महिलांना बसभाड्यात ५० टक्के सवलत, इचलकरंजी रस्त्यांसाठी ‘नगरोत्थान’ योजनेतून १०० कोटी रुपयांचा निधी, साध्या मागाला १ रुपये, तर आधुनिक मागाला ७५ पैशांची वीज सवलत देण्यात येईल. अंगणवाडी आणि मदतनीस याची रिक्त पदे भरली जातील. आशासेविकांना न्याय दिला जाईल. महिला बचत गटांचे अनुदान सरकारने १५ सहस्र रुपयांवरून ३० सहस्र रुपये केले आहे. १० शहरातील ५ सहस्र महिलांना ‘पिंक रिक्शा’ देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे.’’ या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांसह अन्य उपस्थित होते.