‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे; म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती. अनुष्ठानाच्या वेळी श्री दुर्गादेवीच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. देवीकडून प्रक्षेपित होणार्या शक्तीमुळे देवीच्या चित्रासमोर उभे राहिल्यावर आपल्याला मागे ढकलल्यासारखे जाणवते.
श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी २२ ते २५.१.२०२४ या कालावधीत देवीच्या चित्राच्या ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
चाचणीविषयी काही टीपा
१. श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षा अधिक असल्याने ती लोलकाने मोजण्यात आली.
२. २२, २४ आणि २५.१.२०२४ या दिवशी शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवात सकाळी पूजेपूर्वी, पूजेनंतर, दुपारी किंवा सायंकाळी, असे दिवसातून ३ ते ४ वेळा देवीच्या चित्राच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून ‘देवीच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे (चैतन्याचे) प्रमाण किती आहे आणि दिवसभरात त्यात काही पालट होतो का ?’, हे अभ्यासता आले. (२३.१.२०२४ या दिवशी पूजेपूर्वी आणि पूजेनंतर अशी दोनच छायाचित्रे चाचणीसाठी मिळाली. दुपारी किंवा सायंकाळी काही कारणाने छायाचित्रे काढता आली नसल्याने ती चाचणीसाठी मिळाली नाहीत.)
३. २५.१.२०२४ या दिवशी देवीच्या चित्राच्या चारही बाजूंनी (समोरून, मागून, डाव्या आणि उजव्या अंगाकडून) चाचण्या करण्यात आल्या. यातून ‘देवीच्या कोणत्या अंगाकडून सर्वाधिक शक्ती प्रक्षेपित होत आहे’, हे अभ्यासता आले. (त्याची माहिती श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या नोंदी या सारणीत दिल्या आहेत.)
४. २५.१.२०२४ या दिवशी अनुष्ठानाचा शेवटचा दिवस होता. दुसर्या दिवशी म्हणजे २६.१.२०२४ या दिवशी सकाळी, तसेच साधारण ४ दिवसांनी (३०.१.२०२४ या दिवशी) सकाळी देवीच्या चित्राच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून ‘देवीच्या चित्रावर झालेला परिणाम पुढे किती दिवस टिकून रहातो ?’, हे अभ्यासता आले.
वरील सारणीतून लक्षात आलेली सूत्रे –
१ अ. पूजेपूर्वी श्री दुर्गादेवीच्या चित्रात नकारात्मक ऊर्जा आढळून येणे; पण पूजेनंतर ती नाहीशी होणे : २२, २३ आणि २५.१.२०२४ या दिवशी पूजेपूर्वी श्री दुर्गादेवीच्या चित्रात अनुक्रमे ६०.८ मीटर , ५३.८ मीटर आणि ४५.६ मीटर, म्हणजे उतरत्या क्रमात नकारात्मक ऊर्जा आढळून आली; पण पूजेनंतर ती नाहीशी झाली.
१ आ. पूजेनंतर काही घंट्याने देवीच्या चित्रात नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : २२, २४ आणि २५.१.२०२४ या दिवशी दुपारनंतर देवीच्या चित्रामध्ये अनुक्रमे ३४.८ मीटर, ६६ मीटर आणि ७६.८ मीटर म्हणजे चढत्या क्रमात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. २५.१.२०२४ या दिवशी अनुष्ठानाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सायंकाळी, तसेच २६.१.२०२४ आणि ३१.१.२०२४ या दिवशी सकाळी देवीच्या चित्रात नकारात्मक ऊर्जा आढळून आली नाही.
१ इ. अनुष्ठानाच्या कालावधीत श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होणे : २२ ते २६.१.२०२४ या कालावधीत श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत गेल्याचे दिसून आले. २२.१.२०२४ या दिवशी पूजेपूर्वी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा ५२८० मीटर, तर २६.१.२०२४ या दिवशी ती ४०५२० मीटर झाली. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
१ ई. श्री दुर्गादेवीच्या उजव्या अंगाने सर्वाधिक शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित होणे : २५.१.२०२४ या दिवशी सायंकाळी देवीच्या चित्राच्या चारही बाजूंनी (म्हणजे पुढून, मागून, डावीकडून आणि उजवीकडून) चाचण्या करण्यात आल्या. या नोंदींतून लक्षात आले की, देवीच्या उजव्या अंगाने सर्वाधिक शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित होत आहे.
१ उ. अनुष्ठान संपल्यानंतरही श्री दुर्गादेवीच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) टिकून असणे : २५.१.२०२४ या दिवशी अनुष्ठानाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी दुपारी ५ वाजता केलेल्या चाचणीतून देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा २४०६० मीटर होती आणि सायंकाळी ६.५० वाजता तिच्यात वाढ होऊन ती २५८८० मीटर झाली. दुसर्या दिवशी सकाळी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा ४०५२० मीटर झाली. हे पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीच्या चित्राची ४ दिवसांनी पुन्हा चाचणी केली, तेव्हा चित्रातील सकारात्मक ऊर्जा ३६५२० मीटर झाली. या संशोधनातून ‘देवीच्या चित्रातील चैतन्यात विलक्षण वाढ झाली आहे आणि ४ दिवसांनंतरही त्यातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात टिकून आहे’, हे लक्षात आले.
१ ऊ. श्री दुर्गादेवीच्या चित्रात काही वेळा नकारात्मक ऊर्जा आढळून येण्याचे कारण : या अनुष्ठानाचा उद्देश ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, हा होता. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिवंत रहाणे अत्यावश्यक आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे. या अनुष्ठानाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांना देवीकडून शक्ती मिळत होती. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांवर सूक्ष्मातील आक्रमणे करतात. श्री दुर्गादेवी या वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करून त्यांचे आक्रमण परतवून लावते. या सूक्ष्म युद्धाचा तात्कालिक परिणाम म्हणून अनुष्ठानाच्या कालावधीत देवीच्या चित्रात काही वेळा नकारात्मक ऊर्जा आढळून आली. (क्रमशः पुढच्या रविवारी)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.२.२०२४)
इ-मेल : [email protected]
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/774490.html