Cyber Attack Vedic Clock : ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ्या’च्या अ‍ॅपवर सायबर आक्रमण

उज्जैन (मध्यप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आठवड्यापूर्वी येथील जंतरमंतरवर नव्याने बसवण्यात आलेल्या ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’चे उद्घाटन केले होते. त्याचे अ‍ॅप ८ मार्चपासून सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे; मात्र त्यापूर्वीच त्याच्यावर सायबर आक्रमण करण्यात आले आहे. यामुळे या घडाळ्याची प्रक्रिया मंदावली आहे. वेळ सांगतांना चुका होतांना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

(सौजन्य : News State MP Chhattisgarh)

१. हे वैदिक घड्याळ बनवण्यात महत्त्वाचे योगदान देणारे आरोह श्रीवास्तव म्हणाले की, वैदिक घड्याळावर सायबर आक्रमण झाल्याने ‘सर्व्हर’ फारच मंदावले आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांना त्याचा वापर करता येत नाही. आम्ही सध्या ‘सर्व्हर’ पूर्णपणे सुरक्षित करत आहोत.

२. हे जगातील पहिले डिजिटल वैदिक घड्याळ आहे, जे भारतीय पंचांग आणि मुहूर्त यांची माहिती भारतीय प्रमाणवेळेत देते. हे घड्याळ भ्रमणभाष संच आणि दूरचित्रवाणी संच यांवरही पहाता येऊ शकते. याचे अ‍ॅप हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय, तसेच परदेशी भाषांमध्ये बनवण्यात आले आहे. इंटरनेटशी जोडल्यामुळे ते जगात कुठेही वापरले जाऊ शकते.