Jaishankar Japan Visit : स्वातंत्र्यानंतर आमच्यावर आक्रमणे झाली, तेव्हा जगाची तत्त्वे कुठे होती ?

रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

टोकियो (जपान) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर जपानच्या दौर्‍यावर आहेत. येथे त्यांना एका जपानी पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही सार्वभौमत्वाच्या सन्मानाविषयी बोलतात; मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर भारताने कधीही टीका केली नाही. हा दुटप्पीपणा नाही का ?’ यावर डॉ. जयशंकर उत्तर देतांना म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतावर आक्रमण झाले. आमची सीमा अनेक वेळा पालटण्यात आली; पण कुणीही तत्त्वे किंवा सिद्धांत सांगून आमच्यासमवेत आले नाही. आजही भारताचा काही भाग इतर देशांनी कह्यात घेतला आहे; पण यावर कुणाचेही सिद्धांत नाहीत आणि ते भारताला पाठिंबा देण्याविषयी बोलत नाहीत.’

जयशंकर पुढे म्हणाले की,

१. जगाला समजणे फार कठीण आहे. येथे अनेक मान्यता आणि सिद्धांत आहेत. जागतिक राजकारणात अनेकदा देश त्यांच्या सोयीनुसार तत्त्वे निवडतात, तसेच ते इतर देशांवर त्यांच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी दबाव आणतात.

२. आज भारताला सांगितले जाते की, सार्वभौमत्वासारख्या मूल्यांचे रक्षण केले पाहिजे; परंतु ८० वर्षांपूर्वी ही मूल्ये कुठेच दिसत नव्हती.

संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा झाली पाहिजे !

१. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याविषयी जयशंकर म्हणाले की, आज बहुतेक देशांना वाटते की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पालट व्हायला हवेत. जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली, तेव्हा त्यात जवळपास ५० देश होते, तर आज २०० देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत. एखाद्या संस्थेतील सभासदांची संख्या ४ पटींनी वाढते, तेव्हा तिचा नेता आणि कार्यपद्धती पूर्वीसारखी राहू शकत नाही.

चीनचे नाव न घेता जयशंकर म्हणाले की, ज्या देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पालट नको आहे, तेच आहे ती पद्धत पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

२.  भारत आणि जपान यांना परिषदेत स्थान मिळणे आवश्यक आहे. जगातील सर्वाधिक  लोकसंख्या असलेला देश आणि काही मोठे पुरवठादार देश यांना संयुक्त राष्ट्रांच्या बाहेर ठेवणे, हे या संस्थेसाठी चांगले नाही. त्यामुळे या दोन्ही देशांना लवकर परिषदेत स्थान द्यावे, अशी आमची इच्छा आहे.

३. येथे एकही आफ्रिकी देश सदस्य नाही. एकही दक्षिण अमेरिका खंडातील देश सदस्य नाही. आफ्रिका खंडात ५० पेक्षा अधिक देश आहेत; परंतु एकही सदस्य नाही.

४. आज जगभरात अनेक महत्त्वाचे प्रश्‍न आहेत; परंतु त्यामध्ये संयुक्त राष्ट्रे भूमिका बजावत नाही.

५. सुरक्षा परिषदेत पालट होणार, हे आम्हाला ठाऊक आहे. तो कधी येईल ?, किती वेळ लागेल ? आणि त्याचे स्वरूप काय असेल ? हे खरे प्रश्‍न आहेत.