अंगणवाडीतील मुलांना पोषण आहारात कीडयुक्त धान्याचे वाटप !

लहानांच्या जिवाशी खेळणार्‍या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करून कंत्राट रहित करण्याची ‘आप’ची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्रं

येरवडा (जिल्हा पुणे) – येरवडा येथील जय जवाननगरमधील एका अंगणवाडीत मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली कीड लागलेला हरभरा आणि डाळ वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पालकांनी अंगणवाडीत जाऊन निश्चिती केल्यावर मुलांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप केले जात असल्याचे दिसून आले. जनावरांना दिले जाणारे कीड लागलेले खाद्य वाटून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणार्‍या धान्य कंत्राटदारावर गुन्हा नोंद करून कंत्राट रहित करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने अंगणवाडीत येणार्‍या मुलांच्या पोषण आहारासाठी पालकांना प्रत्येक महिन्याला धान्याची पाकिटे पुरवली जातात. यामध्ये गहू, डाळी, मीठ यांचा समावेश असतो. येरवडा येथील जय जवाननगरमध्ये ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजने’तील १११ क्रमांकाच्या अंगणवाडीतील २० ते २५ मुलांना काही महिन्यांपासून पोषण आहाराच्या नावाखाली कीड लागलेले निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलीचे पालक विशाल शेलार यांना धान्याच्या दर्जाविषयी संशय आला. त्यांनी ‘आप’च्या पदाधिकार्‍यांना माहिती देऊन अचानक भेट देऊन धान्याची पहाणी केल्यावर हरभरा आणि डाळ यांना कीड लागली होती. या वेळी वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.

‘आप’चे पदाधिकारी मनोज शेट्टी यांनी सांगितले की, धान्याला कीड लागल्याचे माहिती असूनही ठेकेदाराने संपूर्ण शहरात निकृष्ट दर्जाच्या मालाचा पुरवठा करून मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. त्यामुळे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, कंत्राटदराचे कंत्राट रहित करून काळ्या सूचीत टाकावे.

यावर बालविकास प्रकल्प अधिकारी (उत्तर) मनीषा बिरारीस यांनी सांगितले की, वरिष्ठांना माहिती देऊन निकृष्ट दर्जाचे धान्य प्रयोगशाळेत पाठवले आहे. ठेकेदाराने कीड लागलेले धान्य दिल्याने त्याचे कंत्राट रहित करण्याची शिफारस करणार आहे.