महिला दिनानिमित्त बचत गट प्रदर्शन !
रत्नागिरी – महिला बचत गट, महिला उद्योगिनींसाठी गेली २० वर्षे सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे मनापासून काम करत आहेत. त्यांनी आयोजित केलेले प्रदर्शन म्हणजे महिलासाठी पायाभूत अभ्यासक्रमासारखे आहे. येथे भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. संवाद कौशल्य शिकता येते, सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही; पण अपयश आल्यास आपण ते पचवायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी यशस्वी उद्योगिनी म्हणून सौ. स्वाती सोनार, सौ. कोमल तावडे, सौ. शुभांगी इंदुलकर यांचा सत्कार सौ. राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महिला पतसंस्थेच्या संचालिका सौ. सरिता बोरकर व्यासपिठावर उपस्थित होत्या. प्राची शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रदर्शनाची वाटचाल थोडक्यात मांडली.
सत्काराला उत्तर देताना सौ. सोनार यांनी सांगितले की, इमिटेशन ज्वेलरी बनवण्याची कला, बोलण्याचे कसब आणि मुंबईची बाजारपेठेची माहिती मला प्राची शिंदे यांनी दिली. प्रदर्शनाच्या निमित्त मी महाराष्ट्राबाहेरही फिरून आले. ग्राहक पेठमुळे माझी उलाढाल ५ लाख रुपयांवर पोचली आहे. कोमल तावडे आणि सौ. इंदुलकर यांनीही ग्राहक पेठमुळे व्यवसाय वाढल्याचे आवर्जून सांगताना नव उद्योगिनींना मार्गदर्शन केले. सौ. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.
हे प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.