चिपळूण – मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तिवरे येथील धरण २ जुलै २०१९ च्या रात्री ९:३० नंतर अचानक फुटले होते. या दुर्घटनेत २२ घरे वाहून गेली आणि २३ जणांचे बळी गेले होते. आता तब्बल ५ वर्षांनी उद्ध्वस्त झालेल्या या धरणाच्या पुनर्बांधणीला राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी ६२ कोटी ७४ लाख रुपये संमत करण्यात आले आहे.
हे धरण फुटल्यानंतर लगेचच तत्कालीन मंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी तिवरे येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली होती. त्याच वेळी तेथील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानुसार काही कुटुंबांना अलोरे येथे घरे देण्यात आली. तर काही कुटुंबे अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत.
अशी परिस्थिती असतांना येथील आमदार शेखर निकम यांनी तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाचा अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर केवळ धरण दुरुस्त न करता त्याची पुनर्बांधणीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी निधीचे प्रावधानही करण्यात आले होते. आमदार शेखर निकम यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले.
५ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिवरे धरण पुनर्बांधणीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे धरणाचे काम पूर्णपणे चित्रीकरणात करण्यात यावे, तसेच संबंधित तज्ञ अधिकार्यांनी कामावर प्रतिदिन उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. आता या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे.